एकलहरेच्या प्रकल्पासाठी रेल्वेमंत्र्यांना भेटणार
By Admin | Updated: January 16, 2015 00:01 IST2015-01-16T00:01:02+5:302015-01-16T00:01:13+5:30
खासदार हेमंत गोडसे यांनी केली रेल्वेच्या जागेची पाहणी

एकलहरेच्या प्रकल्पासाठी रेल्वेमंत्र्यांना भेटणार
नाशिक : तत्कालीन रेल्वेमंत्री मधुकर दंडवते यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकालगत असलेल्या २५० एकर जागेत रेल्वेट्रॅक्शन व कारखाना उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून घेतली होती. त्यापैकी आजमितीस सव्वाशे ते दीडशे एकर जागेत रेल्वेचा ट्रान्सफॉर्मर प्रकल्प उभारण्यासाठी आपण केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
काल गुरुवारी (दि.१५) खासदार हेमंत गोडसे यांनी एकलहरे येथील रेल्वेच्या संबंधित जागेची व कारखान्याची पाहणी केली. मधुकर दंडवते रेल्वेमंत्री असताना त्यांनी नाशिकरोडला रेल्वेचे मशीन बनविण्यासाठी २५० एकर जागा उपलब्ध करून घेतली होती. त्यासाठी आठ ते दहा हजार रेल्वे कामगारही कार्यरत झाले होते. मात्र नंतर झालेल्या रेल्वेमंत्र्यांनी त्यांच्या राज्यात प्रत्येक प्रकल्प नेल्याने आजमितीस फक्त पाचशे कामगार कार्यरत असून, एकलहरे येथे कमीत कमी दीडशे खोल्या व एक हॉस्पिटल रिकामे पडले आहे. रेल्वे मंत्रालय त्यांचे काही सुट्टे भाग खासगी कंपन्यांकडून बनवून घेते, त्याऐवजी असे सुट्टे भाग बनविण्याचा कारखाना उभारण्यात यावा, त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. या जागेत ३३० ट्रान्सफार्मरही कार्यरत असल्याने विजेची समस्या उद््भवणार नसल्याचे खासदार गोडसे यांचे म्हणणे आहे. याबाबत आपण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची दिल्ली येथे भेट घेऊन रेल्वेचा प्रकल्प उभारण्याबाबत निवेदन देणार असल्याचेही गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)