पालिकेचा दवाखाना ‘अत्यवस्थ’

By Admin | Updated: July 15, 2016 00:54 IST2016-07-15T00:51:07+5:302016-07-15T00:54:52+5:30

जुने सिडको : निधीअभावी रखडले काम; रुग्णांची गैरसोय

Medical wing of hospital | पालिकेचा दवाखाना ‘अत्यवस्थ’

पालिकेचा दवाखाना ‘अत्यवस्थ’

सिडको : जुने सिडको येथील महापालिकेच्या दवाखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, खिडक्यांच्या काचादेखील फुटल्या आहेत. तसेच दवाखान्याच्या भिंतींना ठिकठिकाणी तडे गेले आहेत. दवाखान्याची दुरवस्था झाली असून, संपूर्ण दवाखानाच अत्यवस्थ झाला आहे. निधीअभावी दवाखान्याचे काम रखडल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
जुने सिडको येथील मनपाच्या दवाखान्यात रुग्णांची गैरसोय होण्याबरोबरच स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. संपूर्ण दवाखान्यालाच घरघर लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. दवाखान्याची दुरुस्ती करावी, याबाबत प्रभागाच्या शिवसेना नगरसेविका कल्पना पांडे यांचाकडून पाठपुरावा सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वीदेखील नगरसेवक पांडे यांनी अधिकाऱ्यांसमवेत दवाखान्याची पाहणी करून नाराजी व्यक्त केली. जुने सिडको येथे गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेचा दवाखाना सुरू आहे.
या दवाखान्यात जुने सिडकोसह परिसरातील रुग्ण उपचार घेतात. येथे थंडी, ताप, खोकला, लसीकरण, गरोदर माता तपासणी यांसह इतर आजारांवर उपचार केले जातात. या दवाखान्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली असून, याकडे महापालिका लक्ष देत नसल्याचे चित्र बघावयास मिळते. या दवाखान्याचा संपूर्ण परिसर घाण, कचरा तसेच गाजर गवताने वेढलेला आहे. दवाखान्याच्या सर्व खोल्या खराब झाल्या असून, भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे संपूर्ण परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या दवाखान्यात गरोदर मातांच्या तपासणीसाठी टेबलच नाही. अशीच परिस्थिती इतर रुग्णांच्या बाबतीत आहे. रुग्णांसाठी गोळ्या, औषधेही पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने रुग्णांना देण्यात येणारी औषधे खालीच ठेवण्यात आलेली आहेत. नगरसेवक पांडे यांनी मनपा अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला असून, यामुळे पांडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. पिण्याचे पाणी तर नाहीच, परंतु येथे असलेल्या शौचालयाचीही दयनीय अवस्था झाली आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दवाखान्यात सुरक्षा रक्षकदेखील नाही. (वार्ताहर)

Web Title: Medical wing of hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.