वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवरून खडाजंगी
By Admin | Updated: December 22, 2015 23:32 IST2015-12-22T23:29:08+5:302015-12-22T23:32:12+5:30
आरोग्य समिती : तीन तास रोखली सभा

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवरून खडाजंगी
नाशिक : जिल्हा परिषदेअंतर्गत रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांवरून मंगळवारी (दि.२२) आरोग्य समितीच्या मासिक बैठकीत सदस्य व अधिकाऱ्यांची जोरदार खडाजंगी झाली. तब्बल तीन सात सभा रोखून धरण्यात आल्यानंतर सदस्यांना ही रिक्त पदांची माहिती देण्यात आली.
मंगळवारी आरोग्य सभापती किरण पंढरीनाथ थोरे यांच्या उपस्थितीत आरोग्य समितीची मासिक बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच सदस्य डॉ. भारती पवार यांनी जिल्ह्णातील रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती मागविली. उपस्थित जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांची माहिती देता न आल्याने समितीची सभा महिला सदस्य डॉ. भारती पवार, मनीषा बोडके, ज्योती तलवारे यांनी तीन तास रोखून धरली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी धावपळ करीत बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे २०८ पदे मंजूर असून, त्यातील १३ पदे रिक्त आहेत, तर १९५ वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्षात कार्यरत असल्याचे आकडेवारीतून दिसते. कार्यरत १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी १६ वैद्यकीय अधिकारी उच्च शिक्षणासाठी (पी. जी.) गेले आहेत. तसेच सात वैद्यकीय अधिकारी कोणतीही परवानगी न घेता गेल्या कित्येक महिन्यांपासून परागंदा आहेत. तसेच प्रत्यक्षात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या १७२ असून, पूर्ण क्षमतेने आरोग्य केंद्रांवर सुविधा पुरविण्यासाठी ३६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने ती तातडीने भरण्याची मागणी डॉ. भारती पवार यांनी केली. त्यानुसार शासनाकडे रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असे आदेश सभापती किरण थोरे यांनी दिले. दूषित पाण्याचा आढावा घेण्यात आला असता जिल्ह्णात सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा मालेगाव - ४२, नांदगाव - ३४, सिन्नर - ३२, बागलाण - २९ या तालुक्यात होत आहे. जिल्ह्णात एकूण १८८३ पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी २८५ पाणी नमुने (१५ टक्के) दूषित असल्याचे आढळले. डॉ. भारती पवार यांनी दूषित पाण्याच्या स्त्रोतची नियमित पाणी तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाल्या दिल्या. बैठकीस सदस्य ज्योती तलवारे, उत्तम कडू आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)