एमबीबीएस परीक्षेचा निकाल जाहीर
By Admin | Updated: July 28, 2016 01:49 IST2016-07-28T01:47:55+5:302016-07-28T01:49:52+5:30
संकेतस्थळावर अपलोड : आता सीईटीचा मार्ग झाला मोकळा

एमबीबीएस परीक्षेचा निकाल जाहीर
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्रातील एमबीबीएस विद्याशाखेचा निकाल जाहीर झाला असून, मंगळवारी रात्री निकाल संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. एम्सच्या पदव्युत्तर पदवीला विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा यासाठी युद्धपातळीवर निकालयंत्रणा राबवून अवघ्या बारा दिवसांत निकाल देण्यात आला.
एमबीबीएसच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या परीक्षेसाठी राज्यातून सुमारे साडेचार हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास जाहीर करण्यात आला. निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापीठाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. महाविद्यालयीन स्तरावरील प्रात्यक्षिक परीक्षेचे गुणदेखील तातडीने आॅनलाइन पद्धतीने मागविण्यात आले होते. महाविद्यालयांना तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये यासाठी तांत्रिकसह परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात आले. एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीसाठी दिल्लीच्या आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सची सीईटी द्यावी लागते. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल ३१ जुलैपूर्वी जाहीर झाले असतील अशाच विद्यार्थ्यांना पीजीची सीईटी देता येते. या सीईटीपासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून विद्यापीठाने युद्धपातळीवर निकालाची प्रक्रिया पूर्ण केली. एमबीबीएच्या अंतिम वर्षाचे ७३६ इतके विद्यार्थी पीजीच्या सीईटीसाठी पात्र होते. या निकालामुळे त्यांचा सीईटीचा मार्ग मोकळा झाला आहे.