युतीचे महापौर दिवे अनेक घडामोडींनी चर्चेत
By Admin | Updated: February 7, 2017 22:56 IST2017-02-07T22:56:28+5:302017-02-07T22:56:46+5:30
युतीचे महापौर दिवे अनेक घडामोडींनी चर्चेत

युतीचे महापौर दिवे अनेक घडामोडींनी चर्चेत
इतिहास चाळताना
महापालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा बहुमताच्या समीप होते, परंतु त्यांना अपक्षांची मदत घ्यावी लागली. त्यामुळेच वसंत गिते हे युतीचे पहिले महापौर ठरले. दरम्यान, दुसऱ्या महापौरपदासाठी शासनाने आरक्षण काढल्यानंतर ते अनुसूचित जातीसाठी राखीव निघाले. त्यामुळे उमेदवारांची शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी भाजपा- शिवसेनेकडे अधिकृत नगरसेवक नव्हते अशातला भाग नाही. रुख्मिणी कर्डक भाजपाकडे, तर शिवसेनेकडे बेबीनंदा डगळे हे दोन दावेदार होते. परंतु महासभेत बहुमत मिळवण्याइतपत त्यांची क्षमता नव्हती, असे दोन्ही पक्षांत म्हणणे होते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बहुमत नसताना नगरसेवकांची जुळणी करणेचे काम सोपे नव्हते. अशावेळी वसंत गिते यांचे कसब कामाला आले. त्यांच्या महापौरपदाच्या निवडणुकीत ज्या अपक्ष अशोक दिवे यांनी त्यांना मदत केली, त्यात दिवे यांचे नाव पुढे करण्यात आले. दिवे- गिते जोडीने यश मिळवत युतीकडे महापौरपद कायम ठेवले आणि अशोक दिवे महापौर ठरले. अशोक दिवे यांचे पक्षीय संबंध अनेकदा वादग्रस्त ठरले. महापौर झाल्यानंतर त्यांनी कार्यालयाचे नूतनीकरण केले. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तसबीर अडगळीत टाकल्याचा त्यांच्यावर आरोप झाल्याने शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुखांनी महापालिकेच्या बाहेर आंदोलन केले. दिवे यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीतच तिजोरीच्या चाव्या मात्र कॉँग्रेसकडे गेल्या. शाहू खैरे स्थायी समितीचे सभापती झाले, त्यावेळी उभयतांमधील सूप्त संघर्षही चर्चेचा ठरला होता. दिवे यांच्या कारकिर्दीत महत्त्वाचे काम म्हणजे फाळके स्मारक आणि बौद्ध स्मारकाचा वाद सोडविला. दोन्ही गटांच्या मागण्या त्यांनी मान्य करून जोड स्मारक करण्याच्या विषयाला मंजुरी दिली. त्यामुळेच हा विषय मार्गी लागला. - संजय पाठक