रशीद शेख मालेगावचे महापौर तर सखाराम घोडके उपमहापौर
By Admin | Updated: June 14, 2017 14:06 IST2017-06-14T14:03:36+5:302017-06-14T14:06:47+5:30
मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसचे रशीद शेख यांची निवड झाली आहे तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या सखाराम घोडके यांची निवड झाली आहे.

रशीद शेख मालेगावचे महापौर तर सखाराम घोडके उपमहापौर
ऑनलाइन लोकमत
मालेगाव, दि. 14- महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे रशीद शेख 41 मतं मिळवून महापौरपदी विराजमान झाले आहेत. निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. तर राष्ट्रवादी-जनता दलाचे नबी अहमद यांना 34 मतं मिळाली. निवडणुकी दरम्यान एमआयएमचे 7 सदस्य तटस्थ होते तर भाजपचे दोन सदस्य सभागृहात गैरहजर राहिले. तर उपमहापौरपदासाठी शिनसेनेच्या सखाराम घोडके यांची निवड झाली आहे. सखाराम घोडके यांना एकुण 41 मतं मिळाली आहेत. उपमहापौर पदाच्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी सेनेला पाठिंबा दिला. सखाराम घोडके यांच्या विरोधात असणारे जनता दल- राष्ट्रवादीचे उमेदवार मन्सूर अहमद यांना 24 मतं मिळाली. निवडणुकीच्या वेळी भाजपचे सुनील गायकवाड यांनी माघार घेतली.
महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदासाठी बुधवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर त्रिशंकू परिस्थितीत महापालिका होती. महापालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत नव्हतं पण काँग्रेस-शिवसेना आघाडी बहुमताच्या जवळ होती. त्यामुळे या आघाडीचं भवितव्य विरोधकांच्या समीकरणावर अवलंबून होतं.
गेल्या महिन्यात झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला ८४ पैकी सर्वाधिक २८ जागा मिळाल्या होत्या तर २७ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी-जनता दल युतीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू झाली होती. बहुमताचा ४३ हा आकडा गाठण्यासाठी तेरा जागा मिळविणारी शिवसेना, नऊ जागा मिळविणारा भाजप व सात जागा मिळविणारा एआयएम या तिन्ही पक्षांची मदत मिळविण्यासाठी दोन्ही काँग्रेसकडून प्रयत्न सुरू होते. त्यात शिवसेनेची साथ मिळविण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी झाला होता.