मायेचा ओलावा, प्रेमाचे बंध...

By Admin | Updated: August 11, 2014 00:57 IST2014-08-11T00:25:57+5:302014-08-11T00:57:35+5:30

मायेचा ओलावा, प्रेमाचे बंध...

Maya's moisture, love bonds ... | मायेचा ओलावा, प्रेमाचे बंध...

मायेचा ओलावा, प्रेमाचे बंध...

 नाशिक : भाऊ-बहिणीतील पवित्र प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा राखीपौर्णिमेचा सण शहर परिसरात पारंपरिक उत्साहात साजरा झाला. त्याच्या तयारीसाठी भगिनींची आठवडाभरापासून लगबग सुरू होती. लाडक्या बंधुरायाला ओवाळत राखी बांधून भगिनीवर्गाने प्रेमाचे बंध आणखी दृढ केले. रक्षाबंधनानिमित्त शहरातील किरकोळ बाजारपेठेत चांगली उलाढाल झाली.
हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते, त्याच्या मनगटावर राखी बांधून त्याला दीर्घायुष्य लाभण्याची प्रार्थना करते, तर भाऊही बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. घरोघरी पारंपरिक उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या या सणाचे वेध पंधरवडाभर आधीच लागतात. बहीण विवाहित असल्यास भाऊ तिच्या घरी जाऊन राखी बांधून घेतो, तर काही विवाहित भगिनी खास रक्षाबंधनासाठी माहेरी येतात.
शहरात महात्मा गांधी रोड, रविवार कारंजा, अशोकस्तंभ आदि भागांत मनमोहक राख्यांची दुकाने थाटली होती. तेथे राख्यांच्या खरेदीसाठी गेल्या दोन दिवसांपासून गर्दी होती. यंदा रक्षाबंधनासाठी सकाळऐवजी दुपारी किंवा सायंकाळी योग्य मुहूर्त असल्याचे संदेश शनिवारी व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत होता. त्यामुळे अनेकांनी सायंकाळी रक्षाबंधन साजरे केले. काही भगिनींनी दूरवरच्या भाऊरायासाठी पूर्वीच टपाल किंवा कुरिअरद्वारे राख्या पाठवून दिल्या. काहींनी आॅनलाइन राख्या पाठवण्याच्या सुविधेचा वापर केला. (प्रतिनिधी)

Web Title: Maya's moisture, love bonds ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.