जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योजनेत सहभागी व्हावे
By Admin | Updated: September 22, 2016 00:58 IST2016-09-22T00:58:14+5:302016-09-22T00:58:42+5:30
एस. टी. घुले : त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योजनेत सहभागी व्हावे
त्र्यंबकेश्वर : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद करताना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन प्रा. एस. टी. घुले यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय
सेवा योजनेचा उद्घाटन समारंभ
डॉ. स्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व घुले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस. एम. माळी, प्रा. गोरक्षनाथ पिंगळे, प्रा. छाया शिंदे, प्रा. दीपाली पडोळ, प्रा. देठे, प्रा. आर. डी. झनकर, प्रा. थोरात, प्रा. कांबळे, प्रा. मगर, प्रा. आशिष सोनवणे, प्रा. गावंडे, प्रा. आर. व्ही. जाधव, महाविद्यालयीन प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
याप्रसंगी घुले यांनी समाजात वावरणाऱ्या विविध वर्गांचे स्पष्टीकरण केले. मानवी जीवनात दानाचे महत्त्व अनन्यसाधारण असून, संपत्ती दानाबरोबरच मानवी अवयवदान हे दानात सर्वश्रेष्ठ दान असल्याचे मत व्यक्त करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अवयवदान करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. स्मिता पाटील यांनी महाविद्यालयात झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होताना स्वयंसेवकांनी डोळसपणाने समाजपयोगी कामे करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकातून प्रा. डॉ. एस. एम. माळी यांनी कार्यक्रमाचा तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापनेचा हेतू स्पष्ट केला. जगण्यासाठी शैक्षणिक, बुद्धिमत्तेबरोबर सामाजिक, भावनिक व आध्यात्मिक बुद्धिमत्तादेखील महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पूर्ण वर्षभर होणाऱ्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. काळे यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमात सातत्याने विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये प्रेरणा देण्याचे काम करतात. कार्यालयीन प्रमुख तिडके, जगताप, गायकवाड व गोसावी तसेच रासेयो स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
शिवानी कदम हिने केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत
प्रभाकर शिंदे यांनी केले. आभारप्रदर्शन भगवान गोऱ्हे याने
केले. (वार्ताहर)
जीवनात सकारात्मक विचारांची गरज
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठा हे तत्त्व जोपासून समाजाचे ऋण फेडण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. अलीकडे माणुसकीच्या धर्माचा ऱ्हास होत चालला आहे. माणुसकीचा धर्म पाळण्यासाठी सेवा योजनेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले. हे स्पष्ट करताना त्यांनी गॅलिलिओ, न्यूटन या शास्त्रज्ञांची उदाहरणे दिली. जीवनात सकारात्मक विचार करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण विकसित होतात, असे स्पष्ट करून योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊ शकतो व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायला मदत होते, असे मत घुले यांनी व्यक्त केले.