स्मशानातील रॉकेल गैरव्यवहाराच्या सरणावर !
By Admin | Updated: June 20, 2014 00:50 IST2014-06-20T00:50:50+5:302014-06-20T00:50:50+5:30
मनमाड : येथील अमरधाममध्ये गेल्या दोन वर्षांपासून अंत्यसंस्कारासाठी रॉकेल उपलब्ध होत नसल्याने महागड्या पेट्रोल - डिझेलचा वापर करून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

स्मशानातील रॉकेल गैरव्यवहाराच्या सरणावर !
मनमाड : येथील अमरधाममध्ये गेल्या दोन वर्षांपासून अंत्यसंस्कारासाठी रॉकेल उपलब्ध होत नसल्याने महागड्या पेट्रोल - डिझेलचा वापर करून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. शासकीय यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे स्मशानातील रॉकेल चक्क गैरव्यवहाराच्या ‘सरणावर’ जाऊन पोहोचले की काय, असा प्रश्न यामुळे उपस्थित करण्यात येत आहे.
शहरातील वैकुंठधाम या प्रमुख स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी शासकीय दरात उपलब्ध होणारे रॉकेल तब्बल दोन वर्षांपासून गायब असल्याने येथील जीवनाच्या अंतिम समयीसुद्धा महागडे पेट्रोल - डिझेल वापरून अंत्यसंस्कार करण्याची वेळ मनमाडकरांवर आली आहे. या ‘स्मशानातील रॉकेल’मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शहर भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.
मनमाड येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी दरमहा १०० ते १२५ लिटर रॉकेलचा अधिकृत शासकीय कोटा असल्याचे सांगण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून अंत्यसंस्कार व्यवस्थेसाठी स्मशानभूमीत रॉकेल उपलब्ध झालेले नाही.
या कालावधीमध्ये मनमाड शहरातील तसेच रेल्वे अपघातातील सुमारे ४३८ मृतदेहांचे अंत्यसंस्कार खासगी पेट्रोलपंपावरून महागडे डिझेल व पेट्रोल वापरून करण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
शासनाच्या बेजबाबदारपणामुळे जीवनाच्या अंतिमसमयीदेखील महागडे पेट्रोल व डिझेल वापरून अंत्यसंस्कार करण्याची वेळ मनमाडकरांवर आली आहे. या दुर्दैवाला कारणीभूत असलेल्या अकार्यक्षम शासनाने त्वरित या प्रकरणात लक्ष घालून मनमाड स्मशानभूमीसाठी असलेला सहामाही ६०० लिटर रॉकेलचा कोटा वाढवून १००० लिटरचा करावा तसेच रॉकेल वेळेवर उपलब्ध करून द्यावे
तसेच २०१२ पासून रॉकेल पुरवठा का झाला नाही व त्यात काय गैरव्यवहार झाला याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असे भाजपाच्या निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)