मौलानाबाबा उरूस उत्साहात
By Admin | Updated: December 12, 2015 22:42 IST2015-12-12T22:41:29+5:302015-12-12T22:42:32+5:30
कसबे सुकेणे : लाखो रसिकांनी लुटला कव्वालीचा आनंद

मौलानाबाबा उरूस उत्साहात
कसबे सुकेणे : येथील सुप्रसिद्ध हजरत सय्यद मौलानाबाबांच्या संदल व उरुसाची दिल्लीच्या सुप्रसिद्ध चाँद कादरींच्या कव्वाली कार्यक्रमाने सांगता झाली. कडाक्याच्या थंडीतही राज्यभरातून आलेल्या सुमारे दीड लाख भाविकांनी हजेरी लावून कव्वालीचा आनंद लुटला.
संपूर्ण राज्यात सुप्रसिद्ध असलेल्या येथील मौलानाबाबांच्या उरुसाची सांगता झाली. राज्याच्या व नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या सुमारे दीड लाख मुस्लीम व हिंदू भाविकांनी या उरुसात सहभाग घेतला. दुपारी कसबे सुकेणे शहरातून भव्य जुलूस व फातेहा झाल्यानंतर सायंकाळी दर्ग्याचे खादीम सय्यद अय्युब कादरी, तय्यब गुलाब हुसेन मणियार, अब्दुल गुलाब हुसेन व कसबे सुकेणे मुस्लीम पंच कमिटीच्या मान्यवरांनी दर्ग्यावर संदल चढविला व सामूहिक प्रार्थना केली. उरुसाचे मुख्य आकर्षण असलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात दिल्ली येथील सुप्रसिद्ध चाँद कादरी यांची मैफल पहाटेपर्यंत उत्तरोत्तर रंगत
गेली.
कव्वालप्रेमींची हजारोंची गर्दी पाहता यंदा संयोजकांनी व्यासपीठाच्या भोवती बाउन्सर सुरक्षारक्षक नेमले होते तर एलईडी वॉलची व्यवस्था करण्यात आली होती. यानिमित्ताने मौलानाबाबांचा दर्गा नयनरम्य विद्युत रोषणाईने अक्षरश: न्हाऊन निघाला होता. ओझर- सुकेणे रस्त्यावर ओणे फाटा ते थेरगावपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.
कसबे सुकेणे व ओझर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. सुप्रसिद्ध क व्वाल कसबे सुकेणे येथे राज्यात पहिल्यांदाच आल्याने मुंबई, भुसावळ, जळगाव, भिंवडी, ठाणे, नाशिक, मालेगाव, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, धुळे, श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, गुजरात या भागातून भाविक व कव्वालप्रेमी खासगी वाहनांनी सुकेणे येथे दाखल झाले होते. (वार्ताहर)