‘मॅट’ने पोलीसपाटील उमेदवारांना दिलासा

By Admin | Updated: May 9, 2017 01:47 IST2017-05-09T01:47:24+5:302017-05-09T01:47:33+5:30

नाशिक : वर्षभरापूर्वी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या पोलीसपाटील भरतीत गुणदानात डावलले गेलेल्या उमेदवारांना मॅटने दिलासा दिला

'Matt' relief for the police force candidates | ‘मॅट’ने पोलीसपाटील उमेदवारांना दिलासा

‘मॅट’ने पोलीसपाटील उमेदवारांना दिलासा

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वर्षभरापूर्वी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या पोलीसपाटील भरतीत गुणदानात डावलले गेलेल्या उमेदवारांना मॅटने दिलासा दिला असून, निव्वळ नातेवाइकांवर पोलिसांत गुन्हे दाखल असल्याच्या कारणावरून दोघा महिलांनाही ‘गुन्हेगार प्रवृत्ती’चे ठरविण्याची तत्कालीन प्रांत अधिकाऱ्यांची कृती मॅटने बेकायदेशीर ठरवून एका महिलेला थेट पोलीस पाटीलपदी नियुक्ती देण्याचे तर दुसऱ्या महिलेची फेर तोंडी मुलाखत घेण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या वर्षी मे महिन्यात जिल्ह्णात एकाच वेळी पोलीस पाटील व कोतवाल भरतीची प्रक्रिया राबविण्यात येऊन त्यासाठी उमेदवारांच्या लेखी व तोंडी मुलाखतीचा पॅटर्न ठरविण्यात आला होता. ८० गुणांच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना, गुणवत्तापात्र उमेदवारांना तोंडी मुलाखतीसाठी वैध ठरविण्यात आले होते व तोंडी गुणदानाची जिल्हाधिकाऱ्यांनी पद्धत ठरवून दिली होती. जिल्ह्णातील सर्व प्रांत अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पद्धतीचा अवलंब केला, मात्र सिन्नर- निफाडच्या तत्कालीन प्रांत अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीने तोंडी मुलाखतीचा पॅटर्न ठरविला, परिणामी अनेक गुणवत्तापात्रांना या मुलाखतीतून डावलले गेल्याचे तर पात्र नसलेल्यांवर मर्जी दाखविण्यात आल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या. या साऱ्या प्रकाराची चौकशी करण्यात येऊन ज्या ज्या उमेदवारांवर अन्याय झाला त्यांची फेर तोंडी मुलाखत घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनीही या प्रकरणात आपल्याच खात्याची बदनामी नको म्हणून नंतर अंग काढून घेत, न्यायासाठी थेट न्यायालयात जाण्याचा सल्ला उमेदवारांना दिला. त्यातील मीना कुंभार्डे व प्रतिभा कुंदर या दोन्ही महिलांना ‘मॅट’ने दिलासा दिला आहे.
मीना कुंभार्डे यांना लेखी परीक्षेत ४८ गुण मिळाले होते व त्यांचे प्रतिस्पर्धी सुनीता सूर्यवंशी व आशा निकम यांना ४२ गुण मिळाले होते. मात्र तोंडी मुलाखतीत कुंभार्डे यांना डावलण्यात येऊन आशा निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. विशेष म्हणजे आशा निकम यांच्यापेक्षा मीना कुंभार्डे यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक असताना त्यांना डावलले गेल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. मात्र, या संदर्भातील तक्रारी झाल्यानंतर कुंभार्डे यांच्या माहेरच्या मंडळींवर पोलिसांत गुन्हा दाखल असल्याचे कारण दर्शवून त्यांना नाकारण्यात आल्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला व नेमके त्यावरच मॅटने बोट ठेवले. माहेरच्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल असल्यास याचा अर्थ सासरी नांदणारी महिलाही गुन्हेगार ठरते काय, असा सवाल मॅटने विचारून प्रशासनाला चांगलेच फटकारले होते. असाच प्रकार प्रतिभा कुंदर यांच्याबाबतीत घडला.

Web Title: 'Matt' relief for the police force candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.