गट आरक्षित झाल्याने मातब्बरांचा हिरमोड
By Admin | Updated: January 20, 2017 00:28 IST2017-01-20T00:28:24+5:302017-01-20T00:28:37+5:30
उमराणे गट : राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला

गट आरक्षित झाल्याने मातब्बरांचा हिरमोड
भगवान देवरे उमराणे
यंदा उमराणे गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीही स्थानिक मातब्बरांचा हिरमोड झाला असून, याच गटातील उमराणे गण मात्र सर्वसाधारण झाल्याने येथे तरुण इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. त्याचबरोबर या गणातून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी स्थानिक पारंपरिक राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. दहिवड गण हा इतर मागास वर्ग स्त्रीसाठी आरक्षित असल्याने या गणात मात्र चुरस कमी असणार आहे.
आतापर्यंतच्या निवडणुकांचा इतिहास पाहता उमराणे गटात कुठल्याही राजकीय पक्षांचे विशेष प्राबल्य नसून या गटात पूर्वीपासून पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला परिचित असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कर्मवीर ग्यानदेवदादा देवरे व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विश्वासराव देवरे यांच्या घराण्यांभोवतीच स्थानिक ग्रामपंचायतीपासूनच्या सर्वच निवडणुका अत्यंत चुरशीच्या लढविल्या गेल्या. आजतागायत हे दोन्ही गट राजकारणात सक्रिय असून, ग्यानदेवदादा देवरे यांच्या गटाचे नेतृत्व माजी सदस्य कै. निवृत्ती देवरे यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे पुतणे व बाजार समितीचे सभापती विलास देवरे सांभाळत आहेत. विश्वासराव देवरे यांच्या गटाचे नेतृत्व त्यांचे पुत्र व सुरगाणा गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे सांभाळत आहेत. त्यामुळे या उमराणे गटात कुठल्या राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळावी यापेक्षा कोणत्या गटाकडून मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांना कसरत करावी लागते.
उमराणे गणातून माजी सदस्य मीनाक्षी देवरे यांनीही राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत अपक्ष उमेदवार व माजी पंचायत समिती उपसभापती रतन देवरे यांची पत्नी सुवर्णा देवरे तसेच शिवसेनेकडून उमेदवारी करत असलेल्या शिवसेनेचे देवळा तालुकाध्यक्ष देवानंद वाघ यांच्या पत्नी वंदना वाघ यांचा पराभव केला होता. तसेच दहिवड गणातून भाजपाचे केदा शिरसाठ यांनी कॉँगेसकडून उमेदवारी करीत असलेले गंगाधर शिरसाठ, राष्ट्रवादीचे आबा खैरनार, अपक्ष केवळ वाघ यांचा पराभव केला होता. तथापि उमराणे गटात फारशी चुरस नसली तरी उमराणे गणातील निवडणुकीमुळे गटाच्या निवडणुकीला खरी रंगत येणार आहे.