विद्यार्थी-पालकांना उलगडले गणिताचे कोडे
By Admin | Updated: May 21, 2014 22:59 IST2014-05-21T22:55:19+5:302014-05-21T22:59:04+5:30
प्रात्यक्षिक अन् प्रयोग : गणित सृजन कार्यशाळेचा समारोप

विद्यार्थी-पालकांना उलगडले गणिताचे कोडे
प्रात्यक्षिक अन् प्रयोग : गणित सृजन कार्यशाळेचा समारोप
नाशिक : शाळेतील गणिताचा तास म्हटला की, वर्गातील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांची या तासाला नकारघंटा असते. गणित म्हणजे अतिशय अवघड विषय, असा समज करून अनेक विद्यार्थ्यांना हा विषय नकोसाच वाटतो. परंतु नाशकात नुकत्याच पार पडलेल्या गणित सृजन कार्यशाळेत मात्र विद्यार्थ्यांचा हा विषय आवडता झाल्याचे दिसून आले. सदर कार्यशाळेचे आयोजन श्री ज्योती बुक सेलर्सच्या वतीने करण्यात आले होते. चारदिवसीय कार्यशाळेचा नुकताच समारोप झाला. यावेळी प्रा. हेमंत चोपडे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व प्रयोगातून गणित शिकविले. चारही दिवस वेगवेगळे विषय शिकवून नकोसा असलेला गणित विषय आवडता झाल्याची प्रतिक्रिया मुलांनी आपल्या अभिप्रायात व्यक्त केली. अशा प्रकारची कार्यशाळा नेहमीच व्हावी, अशी अपेक्षा यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनी व्यक्त केली.
या चारदिवसीय कार्यशाळेत पहिल्या दिवशी त्रिमितीय वस्तूंची दुनिया, दुसर्या दिवशी खेळ गणितीय सूत्रांशी, तिसर्या दिवशी ओरिगामीतून भूमितीय संकल्पना व चौथ्या दिवशी वैदिक गणित प्रात्यक्षिकाद्वारे शिकविण्यात आले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांसह काही पालकही सहभागी झाले होते.
1- मी एक डॉक्टर आहे. पालक म्हणून मी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. कार्यशाळेतील गणित विषयाची शिकवण पाहून मला माझ्या लहानपणीच्या शाळेत बसल्यासारखे वाटले. सध्याचे शिक्षक इतक्या तन्मयतेने आणि आत्मियतेने शिकवतच नाहीत. हाडाचे शिक्षक कसे असतात, हे हल्ली आमच्या मुलांना उदाहरण देण्यासाठीसुद्धा सापडत नाहीत. अशा कार्यशाळांसाठी केवळ चार दिवस अपुरे पडतात, आणखी काही दिवस वाढवायला हवेत.
- डॉ. प्रियंका येवले (पालक)
२- उन्हाळी सुटी वाया जाता कामा नये. सुटीत काहीतरी वेगळे शिकायला मिळाले पाहिजे. त्या अनुषंगाने मी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. या कार्यशाळेत माझी गणिताची भीती दूर झाली. वेगवेगळ्या विषयांवर अशा कार्यशाळा व्हायला हव्यात.
- खुशाल सुनील पिंगळे (विद्यार्थी)
३- गणित हा विषय फार वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने शिकायला मिळाला. जे मी कधीही कोणाकडूनही शिकली नव्हती ते मला या कार्यशाळेतून शिकायला मिळाले.
- मेघना अशोक औटी (विद्यार्थिनी)
४- कार्यशाळेत मला जे काही शिकायला मिळाले, ते खरंच अप्रतिम होते. यापुढे पुन्हा जर अशी कार्यशाळा असेल तर मी नक्कीच सहभाग घेईन.
- अनुष्का त्र्यंबक कुलकर्णी (विद्यार्थिनी)