कुंभमेळ्याच्या खर्चाची जुळवाजुळव
By Admin | Updated: March 20, 2016 00:03 IST2016-03-19T23:45:29+5:302016-03-20T00:03:46+5:30
कुंभमेळ्याच्या खर्चाची जुळवाजुळव

कुंभमेळ्याच्या खर्चाची जुळवाजुळव
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेला निधी व त्यातून कामांवर झालेल्या खर्चाचा ताळमेळ घेण्याचे काम केले जात असून, ज्या ज्या यंत्रणेने कामे केली, त्यांच्याकडून उपयोगीता प्रमाणपत्र घेण्याबरोबरच केलेल्या खर्चाची माहिती मागविण्यात आली आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणी भरलेल्या कुंभमेळ्यासाठी जवळपास २१ यंत्रणांनी कामे केली आहेत, त्यात प्रामुख्याने नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य, वीज, पाटबंधारे या खात्यांकडे महत्त्वाची जबाबदारी होती. सुमारे २४०० कोटी रुपये खर्चाची कामे या काळात करण्यात आली. त्यासाठी शासनाने त्या त्या खात्याला पैसे उपलब्ध करून दिले असले तरी, त्याचा ताळमेळ घेण्याची जबाबदारी कुंभमेळा कक्षाकडे सोपविण्यात आली. सिंहस्थ कुंभमेळा पार पडून पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप नाशिक महापालिका, सार्वजनिक बांधकाम या खात्यांनी केलेल्या कामांचा निधी शासनाकडे पडून आहे. त्यासाठी अगोदर वितरित केलेल्या निधीचा हिशेब, त्यातून केलेल्या कामांचे उपयोगीता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना वेळोवेळी संबंधित खात्यांना देण्यात आल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी पुढचा निधी अडकवून ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर काही ठेकेदारांची देयकेही बाकी आहेत. त्यामागेदेखील विविध कारणे दाखविली जात आहेत. सर्व खात्यांना शासनाने कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला अशा सर्वांना त्यांच्या खर्चाच्या गोशवाऱ्यासह माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)