मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
By Admin | Updated: July 31, 2016 22:20 IST2016-07-31T22:20:42+5:302016-07-31T22:20:55+5:30
नद्यांना पूर : गोदावरी, दारणा दुथडी भरून वाहू लागल्याने सतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
नाशिक : इगतपुरी, दिंडोरी, पेठ सुरगाणा या तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान इगतपुरी तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस झाला आहे, वाडीवऱ्हे परिसरात सर्वात कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. गेल्या महिन्यापासून इगतपुरी तालुक्यात दमदार पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
इगतपुरी, घोटी शहरासह सर्व भागात पावसाने हजेरी लावली. संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद, बेलगाव तऱ्हाळे, बारशिंगवे, सोनोशी, अडसरे, भरवीर, कवडधरा, धामणी, वैतरणा, भावली धरण परिसर, काळूस्ते आदि भागाला कालपासून पावसाने झोडपून काढले.
दरम्यान, या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून तालुक्यातील दारणा, भाम, वाकी, खापरी, कडवा आदि नद्यांना पूर आला आहे.
दमदार पावसामुळे तालुक्यातील प्रमुख धरण असलेल्या दारणा धरणात ७७ टक्के साठा झाला असून कडवा धरण तब्बल ८३ टक्के भरले आहे.
दारणा धरणातून गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने या धरणसमूहातून सुमारे सात टीएमसी पाणी जायकवाडीला देण्यात आले असल्याचे समजते, तर मुकणे धरण परिसरात अल्प पाऊस होत असल्याने या धरणात अवघे २१ टक्के पाणी साचले आहे. (वार्ताहर)