नाशिकमध्ये मुसळधार; गोदावरीला पूरसदृश्य परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 16:48 IST2017-10-11T16:46:39+5:302017-10-11T16:48:20+5:30
गंगापूर धरणातून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाच हजार क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता. दुपारी एक वाजेनंतर हा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी गोदावरीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गोदावरीवरील अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे नदीपात्रात ६ हजार ५६० क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे.

नाशिकमध्ये मुसळधार; गोदावरीला पूरसदृश्य परिस्थिती
नाशिक : शहरात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून मंगळवारी पावसाचा जोर कमी राहिला होता; मात्र बुधवारी सकाळपासून शहरात ढगाळ हवामान कायम असल्याने दुपारी तीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरूवात झाली. सुमारे दीड तास चाललेल्या पावसाने नाशिककरांची दैना उडविली. शहरासह उपनगरांमध्येही पावसाचे थैमान सुरू होते. सर्व परिसर जलमय झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, गंगापूर धरणातून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाच हजार क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता. दुपारी एक वाजेनंतर हा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी गोदावरीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गोदावरीवरील अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे नदीपात्रात ६ हजार ५६० क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे. गंगापूर धरणातून मंगळवारी रात्री बारा वाजता विसर्ग वाढविण्यात आला होता. ५११६ क्युसेकने बुधवारी दुपारपर्यंत विसर्ग सुरू होता; गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने विसर्ग दुपारी एक वाजता ४५४५ क्युसेक तर दोन वाजता ३४४५ आणि चार वाजता २८७४ क्युसेकवर आणला गेला; मात्र शहरात चार वाजेपासून पावसाला पुन्हा जोरदार सुरूवात झाल्याने गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत त्र्यंबकला १२, गंगापूर ११ तर काश्यपी ३८, गौतमी-गोदावरीच्या परिसरात ६९ आणि अंबोली परिसरात ७४ मि.मि इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. एकू णच गंगापूर धरण समुहातील गौतमी, काश्यपी, अंबोली या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला.