सात जोडप्यांचा सामूहिक विवाह
By Admin | Updated: February 27, 2017 00:24 IST2017-02-27T00:23:59+5:302017-02-27T00:24:54+5:30
नाशिक : उडाण एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्या वतीने आयोजित सोळाव्या सामूहिक विवाह (इज्तेमाई शादियॉँ) सोहळ्यात सात जोडप्यांचे लग्न पारंपरिक पद्धतीने लावण्यात आले.

सात जोडप्यांचा सामूहिक विवाह
नाशिक : मुस्लीम समाजात सामूहिक विवाहाची संकल्पना रुजविणाऱ्या उडाण एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्या वतीने आयोजित सोळाव्या सामूहिक विवाह (इज्तेमाई शादियॉँ) सोहळ्यात सात जोडप्यांचे लग्न पारंपरिक पद्धतीने लावण्यात आले. वडाळारोडवरील मिरजकर मैदानात आयोजित विवाह समारंभाप्रसंगी समाजातील विविध मान्यवर वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने झालेल्या या सोहळ्यामध्ये मौलाना वासिक रजा यांनी ‘निकाह’चा विधी पार पाडला. खतीब-ए-शहर हिसामुद्दीन अशरफी यांनी दुआ करत वधू-वरांचे भावी वैवाहिक आयुष्य सुखा- समाधानाचे जावो, ही सदिच्छा व्यक्त केली. समाजातील गरजू घटकांमधील मुला-मुलींचे विवाह जमवून ते थाटामाटात समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व धर्मगुरूंच्या उपस्थितीत पार पाडणे हा एकमेव उद्देश असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष फजल शेख यांनी यावेळी दिली. दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील नववधू-वरांना संस्थेच्या वतीने एकसमान संसारोपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या. सर्व जोडप्यांबरोबर आलेल्या पाहुण्यांसाठी संस्थेच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या विवाह सोहळ्याप्रसंगी समाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक, वकील, डॉक्टर, उद्योजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांघिक प्रयत्न, समाजाचा प्रतिसाद
शहरात सर्वप्रथम मुस्लीम समाजात सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना ‘उडाण’ने राबविण्यास सुरुवात केली. दरवर्षी किमान पाचपेक्षा अधिक जोडप्यांचा विवाह जमवून तो थाटात पार पाडण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी प्रयत्नशील असतात. एक तपापेक्षा अधिक कालावधीपासून संस्थेच्या वतीने अखंडितपणे समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने हा उपक्रम दरवर्षी घेतला जात आहे. या उपक्रमाचा फायदा समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकामधील कुटुंबांना अधिक होत आहे.