शहरासह परिसरात माशा, चिलटांचा वाढला प्रादुर्भाव
By Admin | Updated: July 24, 2016 23:19 IST2016-07-24T23:16:01+5:302016-07-24T23:19:58+5:30
आरोग्य विभाग सुस्त : साथीच्या आजारांनी नाशिककर त्रस्त

शहरासह परिसरात माशा, चिलटांचा वाढला प्रादुर्भाव
नाशिक : पंधरवड्यापासून शहरात विषाणुजन्य आजारांची साथ आणि डासांच्या वाढत्या उपद्रवाने नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाला डासांवर नियंत्रण मिळविणे अवघड होत असताना माशांचाही उच्छाद वाढल्याने साथीच्या आजारांचा तेजीने फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाढत्या डासांमुळे शहरातील विविध उपनगरांमध्ये डेंग्यूचे रुग्णही आढळून आले आहेत. एकीकडे बदलत्या वातावरणामुळे पसरणारे विषाणुजन्य आजार, तर दुसरीकडे वाढत्या डासांमुळे होणारे आजार असा दुहेरी धोका निर्माण झाला आहे. याबरोबरच शहराच्या
विविध उपनगरांमध्ये नागरिकांच्या घरांत डासांसह माशाही घोंगावत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. डास व माशांचा वाढता उच्छाद आरोग्यासाठी धोक ादायक असून, पालिकेच्या आरोग्य व हिवताप नियंत्रण विभागाने यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. शहरात पसरणारे विषाणुजन्य आजार, डास-माशांचा वाढता उपद्रव आणि सार्वजनिक स्वच्छतेचे वाजलेले तीनतेरा यामुळे नागरी आरोग्य सध्या संकटात सापडले आहे. महापालिकेच्या भूमिगत गटार दुरुस्ती, स्वच्छतेची विविध कामे, घंटागाडी व्यवस्थापन, डास प्रतिबंधात्मक औषध-धूर फवारणी आदि सर्व उपाययोजनांची आखणी कोलमडून पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
म्हसरूळ, वरवंडी, शिवनई, मोहाडी तसेच शहरातील वडाळागाव, जुने नाशिक, वडाळारोड, सिडको, उपनगर, डीजीपीनगर, अशोकामार्ग, इंदिरानगर आदि भागांमध्ये
डासांचा प्रादुर्भाव प्रचंड असला
तरी माशांच्या उच्छादानेही नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे.