दिवाळीनिमित्त बाजारपेठ सज्ज
By Admin | Updated: October 22, 2016 00:14 IST2016-10-22T00:13:32+5:302016-10-22T00:14:14+5:30
खरेदीला उत्साह : बहुविध पर्यायांमुळे ग्राहकांना निवडीची संधी

दिवाळीनिमित्त बाजारपेठ सज्ज
सिन्नर : आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून, आकाशकंदील, स्टिकर्स, लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या लक्ष्मी (केरसुणी), खत्यावण्या, बोळके, उटणे, करदोडे, रांगोळ्या, रंग, पणत्या यांची रेलचेल दिसून येत असून, या प्रत्येक गोष्टींमध्ये पर्याय उपलब्ध होत असल्याने ग्राहकांना निवडीची पुरेपूर संधी मिळत आहे. सायंकाळची गर्दी टाळण्यासाठी अनेकजण दुपारच्या वेळी शांततेत खरेदी करून घेत असल्याचे चित्रही दिसून येत आहे. लहानसहान वस्तूंपासून मोठ्या वस्तूंपर्यंत खरेदीची यादी बनविली जात असून, शक्यतो एकाचवेळी सर्व खरेदी आटोपण्यावरही भर दिला जात आहे.
आकाशकंदिलांमध्ये कापडी, कागदी, क्राफ्ट पेपर, प्लॅस्टिक, वेताचे, लाकडी, क्रोशाचे असे असंख्य पर्याय असून, चायनामेड आकाश कंदिलांऐवजी भारतीय बनावटीच्या आकाशकंदिलांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. दोन पैसे जास्त मोजून टिकाऊ व पुढील वर्षीही वापरता येईल असे आकाशकंदील घेण्यावर यंदा अनेकांचा भर दिसत आहे. आकाशकंदील १५० ते १००० रुपयांपर्यंत मिळत असून, रंगसंगती व आकार यात असंख्य पर्याय असल्याने ग्राहक समाधानी दिसत आहेत. याशिवाय घराबाहेर गॅलरीत, खिडकीत तसेच आॅफिस, दुकान आदि ठिकाणी लावण्यासाठीचे छोटे आकाश कंदीलही बाजारात दाखल झाले आहेत. यंदा त्यात रंगसंगती, डिझाइन, आकार यात खूप प्रयोग केलेले दिसून येत आहे. हे आकाशकंदील ४० ते ६० रुपये डझन या दरात उपलब्ध आहेत. लक्ष्मीपूजनाच्या केरसुण्या (लक्ष्मी) गणेशपेठ, सरस्वतीपूल सर्वच बाजारपेठांमध्ये विक्रीस आल्या असून, छोटी केरसुणी दहा रुपये, तर मोठी ३० ते ४० या दरात मिळत आहे. उटण्यांच्या दरात यंदा किंचित वाढ झाली असून, २० रुपयांपासून पॅकिंगमध्ये उटणे विक्रीस उपलब्ध आहे. भाऊबीजेसाठी लागणारे करदोडेही बाजारात दाखल झाले असून, ७ ते १५ रुपयांपर्यंत काळे व लाल रंगांमध्ये ते उपलब्ध आहेत. (वार्ताहर)