उमराणे येथे दर शनिवारी मोठा आठवडे बाजार भरतो. या बाजारात उमराणेसह परिसरातील सात ते आठ गावांतील भाजीपाला, किराणा, धान्य विक्रेत्यांची गर्दी होते, तसेच या सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांसह नागरिकांचीही गर्दी होते; परंतु गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तालुका व ग्रामपंचायत प्रशासनाकडून गेल्या सात महिन्यांपासून हा आठवडे बाजार बंद करण्यात आला होता. या काळात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची माल विक्रीसाठी मोठी अडचण निर्माण होऊन आर्थिक नुकसान सोसावे लागले होते; परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. त्यामुळे येथील आठवडे बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे. आठवडे बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर आदी भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. एरवी कवडीमोल विक्री होणारा भाजीपाला आठवडे बाजार सुरू झाल्याने चांगल्या दरात विकला जात असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे, तसेच किराणा, धान्य, मिठाई, व इतर वस्तू विक्रेत्यांनीही माल विक्रीस आणल्याने खरेदी करण्यासाठी महिलांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
कोट....
कोरोनाचे अद्यापही समूळ उच्चाटन झाले नसून नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळूनच आठवडे बाजारात वस्तू खरेदी-विक्री कराव्यात. सर्वांनी मास्कचा वापर करावा. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी.
- सौ. कमलताई देवरे, सरपंच उमराणे
कोट....
कोरोना काळात आठवडे बाजार बंद असल्याने भाजीपाला विक्रीसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती; परंतु आठवडे बाजार सुरू झाल्याने त्याच भाजीपाल्याला बऱ्यापैकी गिऱ्हाईक मिळू लागल्याने किमान उत्पादन खर्च निघण्यास मदत झाली आहे.
- समाधान देवरे, शेतकरी
फोटो- १८ उमराणे बाजार
180921\18nsk_16_18092021_13.jpg
फोटो- १८ उमराणे बाजार