सजावट साहित्याने बहरली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:26 IST2017-08-23T22:45:03+5:302017-08-24T00:26:58+5:30
परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तयारीने वेग घेतला असून ठिकठिकाणी मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. तसेच बाजारात लहान-मोठ्या श्री गणरायाच्या मूर्ती, आरास, देखावे व शोभिवंत वस्तूंचे स्टॉल थाटण्यात आले आहे.

सजावट साहित्याने बहरली बाजारपेठ
नाशिकरोड : परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तयारीने वेग घेतला असून ठिकठिकाणी मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. तसेच बाजारात लहान-मोठ्या श्री गणरायाच्या मूर्ती, आरास, देखावे व शोभिवंत वस्तूंचे स्टॉल थाटण्यात आले आहे. अवघ्या पाच दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून सर्वत्र बाजारपेठ सजली आहे. सार्वजनिक मंडळाकडून आपआपल्या ठिकाणी मंडप उभारणीचे काम हाती घेतली असून देखावा-आरास येत्या दोन-तीन दिवसांत उभारणीला प्रारंभ होईल, असे चित्र दिसत आहे.
मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून वर्गणीचे नियोजन, पूजेसाठी श्री गणपतीची मूर्ती ठरविणे, कार्यकारिणी फलक, विद्युत रोषणाई, कमान उभारणे आदी कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहे. काही मंडळे आपल्याकडील जुना देखावा विकण्यासाठी व नवीन देखावा घेण्यासाठी ठिकठिकाणी संपर्क करत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची संख्या दरवर्षी कमी होत असल्याने नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवाची धमाल कमी होत असल्याचे चित्र आहे. यंदा एक-दोन मंडळे तांत्रिक अडचणीमुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहेत. पोलीस प्रशासनाकडून गणेशोत्सव मंडळांना ‘आॅनलाइन’ परवानगीसाठी अर्ज करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी, जागा मालकाची परवानगी आदि पद्धतीमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
बिटको चौकात गणेशमूर्तींचे स्टॉल्स
गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी लहान-मोठ्या सुबक श्री गणरायाच्या मूर्तीचे स्टॉल थाटण्यात आले आहेत. तसेच रंगीबेरंगी थर्माकॉलचे मंदिर, आरास, प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा, विद्युत रोषणाईच्या माळा आदी शोभिवंत वस्तू बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याने बाजारपेठ सजली आहे. श्री गणपतीची विविध प्रकारची गिते असलेली सीडीदेखील विक्रीसाठी आल्या आहेत. घराघरांमध्ये श्री गणरायाची आगमनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता केली जात असून कार्यशाळेत शाडूमातीपासून बनविलेल्या गणपतीची स्थापना करणार आहे. घरामध्ये देखावा-आरासदेखील काही ठिकाणी साकारली जात आहे. तसेच सोसायटी, कॉलनी, व्यावसायिक संकुल आदी ठिकाणी असलेल्या छोट्या प्रमाणातील गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे.