नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:46 IST2021-05-12T22:30:57+5:302021-05-13T00:46:27+5:30
नाशिक : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले असून, त्यात गर्दी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचेही व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत; मात्र शेतमाल विक्रीसाठी त्या त्या बाजार समित्यांनी पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद
नाशिक : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले असून, त्यात गर्दी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचेही व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत; मात्र शेतमाल विक्रीसाठी त्या त्या बाजार समित्यांनी पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार लासलगावसह अन्य बाजार समित्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना थेट व्यापाऱ्यांच्या प्लॉटवर अथवा खळ्यांवर जाऊन शेतमाल विक्री करता येणार असून, त्या व्यवहारास बाजार समितीची मान्यता असणार आहे.
लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील सर्व शेतमालाच्या लिलावाचे कामकाज दि. १३ ते २३ मेपर्यंत पूर्णत: बंद राहणार आहे. ज्या शेतकरी बांधवांना आपला शेतीमाल बाजार समितीच्या अनुज्ञाप्तीधारक अडते/व्यापाऱ्यांना त्यांच्या प्लॉटवर (खळ्यांवर) जाऊन विक्री करावयाचा असेल, अशा शेतकरी बांधवांनी संबंधित अडते/व्यापारी यांच्याशी दूरध्वनी अथवा इतर माध्यमांद्वारे संपर्क साधून आपला शेतमाल विक्री करावा, असे बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. दरम्यान, बाजार समित्या बंद राहणार असल्याने लासलगाव येथे प्रतिदिन तीन कोटी, चांदवड समितीचे दीड कोटी तर पिंपळगाव बाजार समितीत प्रतिदिन सात कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. बुधवारी (दि.१२) लासलगाव बाजार समितीत केवळ सकाळी ११ वाजेपर्यंत फक्त कांदा लिलाव झाले. दहा हजार ४०० क्विंटल उन्हाळा कांदा ७०० ते १५५५ व सरासरी १२०० रुपये तर ५४० क्विंटल लाल कांदा ५०० ते ९९० व सरासरी ७५० रुपये भावाने विक्री झाला. पणन संचालनालयाने परिपत्रक काढून सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवता येणार नाहीत, असे म्ह॔ंटले असले तरी कोरोना उपाययोजना होण्यासाठी हे लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी मात्र या बंदला विरोध दर्शवत किमान एक दिवसाआड एका सत्रात तरी हे लिलाव घेण्याची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांचा लाल कांदा नाशवंत आहे. अगोदर बाजार समित्या बंद राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामकाज बंद होत आहे. जर व्यापारी कामकाज बंद ठेवणार असतील तर सरकारने हमीभावाने कांदा खरेदी करावा, अन्यथा नुकसान टाळण्यासाठी बाजार समित्या सुरू ठेवा.
- भारत दिघोळे, प्रदेशाध्यक्ष, कांदा उत्पादक संघटना