गणपती बाप्पांसाठी आकर्षक अलंकार बाजारात

By Admin | Updated: September 12, 2015 23:23 IST2015-09-12T23:22:00+5:302015-09-12T23:23:43+5:30

नावीन्यपूर्ण दागिन्यांची ग्राहकांना भुरळ : देखाव्यांचे काम अंतिम टप्प्यात

In the market the attractive garnish for Ganapati Baba | गणपती बाप्पांसाठी आकर्षक अलंकार बाजारात

गणपती बाप्पांसाठी आकर्षक अलंकार बाजारात

नाशिक : अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. घरगुती गणपतींबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सार्वजनिक मंडळांची देखावे पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू आहे. घराघरातून मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी आकर्षक आरास बनविण्यासाठी घरातील सगळेच सदस्य जोमाने कामाला लागले असल्याचे चित्र शहर परिसरात बघायला मिळते.
‘कोटी कोटी रूपे तुझी - कोटी सूर्य चंद्र तारे’ या उक्तीप्रमाणे गणपती बाप्पांना सजविण्यासाठी बाजारात अनोखी आभूषणे तसेच कलात्मक दागिने विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
घरात पाहुणा म्हणून येणारा बाप्पा भाविकांकडे अर्धा, दीड, तीन, पाच, सात दिवस तर बहुतांश ठिकाणी अनंत चतुर्दशीपर्यंत विराजमान असतात. पाहुणा म्हणून आलेल्या बाप्पांचे यथोचित स्वागत व्हावे, घरात मंगलमयी वातावरण रहावे यासाठी प्रत्येक भाविक आपापल्या परीने योग्य ते नियोजन करत असतो.
घरगुती गणेशोत्सवासाठी शहरातील बाजारपेठेत देखाव्यात मांडता येण्यासाठी, तसेच बाप्पांना सजविण्यासाठी अनेक शोभिवंत प्रकार दाखल झाले आहेत. यामध्ये पाच ते सहा प्रकारांचे विविध आकारातील उंदीर, मोदकांचे विविध प्रकार यामध्ये तीन आणि पाच मोदकांचा समूह, जाळीचा मोदक, उदबत्तीच्या घरासारखे भासणारे मोदक, विड्याच्या पानावर साकारलेल्या गणपतीच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती तसेच आंब्याच्या आणि पिंपळाच्या पानावर साकारलेले अष्टविनायक गणपती दर्शन भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. गणपती अधिकाधिक आकर्षक दिसावा यासाठी बाप्पांच्या सोंडेवर अगदी सहजतेने अडकवता येतील असे अलंकार, नैवेद्य दाखविण्यासाठी केळीचे पान, बाप्पांच्या कानांवर असणाऱ्या अलंकारांपैकी गजकर्णाचीदेखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
गणपतीची मखर आणि देखावा आकर्षक दिसण्याच्या उद्देशाने सुपारी, त्रिशूळ, ओम, परशु, केवड्याचं पान, मोदक हार यांच्या बरोबरच बाप्पांच्या मस्तकावर शोभून दिसेल असे अनेक मुकुटही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. बाजारात ही आभूषणे ८० रुपयांपासून ते ७५० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे. मराठी आणि हिंदी मालिकांचा प्रभाव गणपती मूर्तीप्रमाणेच अलंकाराच्या बाबतीतही पडलेला दिसून येतो.
बाजारात दाखल झालेले दागिने प्रामुख्याने राजकोट, पुणे, मुंबई, वडोदरा या बाजारपेठांतून विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. तसेच काही अलंकार हस्तकलेतून तयार करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या दोन महिने आधीपासूनच बाप्पांचे दागिने बनविणे आणि दागिन्यांची दुकाने थाटण्यात आलेली आहेत. हे दागिने मायक्रो पॉलिशपासून बनविले असून या दागिन्यांचे पॉलिश दीर्घकाळ टिकून राहात असल्याचे विके्रत्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
पूर्वीच्या काळी हस्तकलेपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात वापरल्या जात; परंतु पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही कामानिमित्त बाहेर पडू लागल्याने ‘रेडिमेड’ वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा विशेष कल दिसून येतो. (प्रतिनिधी)

Web Title: In the market the attractive garnish for Ganapati Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.