गुणपत्रिका घोटाळा; समिती नियुक्त

By Admin | Updated: July 3, 2016 23:50 IST2016-07-03T23:27:24+5:302016-07-03T23:50:39+5:30

बिटको महाविद्यालय : संशयितांची होणार चौकशी

Mark sheet scam; Committee appointed | गुणपत्रिका घोटाळा; समिती नियुक्त

गुणपत्रिका घोटाळा; समिती नियुक्त

नाशिकरोड : बिटको महाविद्यालयातील गुणपत्रिका घोटाळाप्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून, या प्रकरणातील संशयित २३ विद्यार्थ्यांना बाजू मांडण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर या प्रकरणातील संशयास्पद भूमिका बजविणाऱ्या कर्मचाऱ्यांचीदेखील चौकशी केली जात असल्याचे वृत्त आहे.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या निकालांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील लिपिक आणि इतरांना हाताशी धरून संगणकात फेरफार करून अनुत्तीर्ण विद्यार्थी उत्तीर्ण दाखविण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे उत्तीर्ण असलेल्या गुणपत्रिकादेखील देण्यात आल्या, तर काहींनी द्वितीय वर्षात प्रवेशदेखील घेतला. सदर प्रकार उजेडात आल्यानंतर महाविद्यालयाने लागलीच संपूर्ण निकाल राखीव ठेवले.
प्रथम वर्षाची परीक्षा आणि निकाल ही प्रक्रिया महाविद्यालयीन पातळीवरच राबविली जाते. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे प्रथम वर्षाचे आॅनलाइन निकालही महाविद्यालयाने १० जून रोजी जाहीर केले होते. परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांना उत्तीर्ण असल्याच्या उत्तरपत्रिका मिळाल्याची बाब चर्चेत आल्याने या प्रकरणाविषयी शंका निर्माण झाली होती.
आॅनलाइन निकालात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी अर्जदेखील दाखल केले होते. त्यांचा अद्याप निकाल आलेला नसताना त्यातील काहींनी द्वितीय वर्षासाठी प्रवेशासाठी अर्ज दाखल केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी प्राचार्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत फेरफार झाल्याची बाब उघड झाली. गेल्या तीन ते चार दिवसांत महाविद्यालयाच्या लक्षात सदर प्रकार आल्यानंतर महाविद्यालयाने या गंभीर प्रकरणाची शहानिशा व विद्यार्थ्यांची बाजू एकूण घेण्यासाठी २३ विद्यार्थ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. विद्यार्थ्यांनी पालकांसह प्रथम वर्षाच्या मूळ गुणपत्रिकेसह महाविद्यालयाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या शनिवारी काही विद्यार्थ्यांची चौकशीदेखील करण्यात आली. प्रथमदर्शनी २३ विद्यार्थी संशयास्पद असल्याचे महाविद्यालयाचे म्हणणे असले तरी संख्या १५० पर्यंत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एका विषयात उत्तीर्ण करण्यासाठी अडीच हजारापासून पुढे वेगवेगळ्या दराने पैसे घेतले असल्याचे समजते. जे विद्यार्थी दोन ते तीन विषय अनुत्तीर्ण आहेत त्यांच्याकडून ८ ते १० हजार रुपये घेण्यात आल्याचीही चर्चा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mark sheet scam; Committee appointed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.