कसबे सुकेणेला बहरल्या झेंडूच्या बागा
By Admin | Updated: October 13, 2015 22:19 IST2015-10-13T22:14:42+5:302015-10-13T22:19:23+5:30
नाशिकसह मुंबई, सुरतला होते फुलांची रवानगी

कसबे सुकेणेला बहरल्या झेंडूच्या बागा
कसबे सुकेणे : नवरात्रीच्या चैतन्य उत्सवात खऱ्या अर्थाने भर घालणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या बागांचा कसबे सुकेणे शिवारात बहर आला असून वर्षभर मुंबई, सुरत, अहमदाबाद, नाशिककरांना पुरवल्या जाणाऱ्या गुलाबाबरोबर आता झेंडूही या मार्गाने निघाला आहे .
द्राक्ष, ऊस व भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे, मौजे सुकेणे या शिवारात फूल शेतीही चांगली बहरली आहे. नाशिक, मुंबई, पुणे, सुरत या मोठ्या शहरांना वर्षभर कसबे सुकेणे येथून गुलाबाच्या विविध जातींची फुले विक्र ीसाठी पाठविली जातात. कसबे सुकेणे येथे टाटा व ग्यलिटीयर या दोन जातींचे प्रमुख उत्पादन घेतले जाते. यंदा गुलाबा बरोबर झेंडूच्या बागांनी सुकेणे व परिसराचा शिवार नटला असून, या बागा कोकणगाव-सुकेणे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे आकर्षण ठरत आहे.
नवरात्र उत्सवात व विजयादशमीच्या दिवशी झेंडूला मोठी मागणी असते. दिवाळी सणात झेंडूच्या फुलांना महत्त्व असते, म्हणून चार पैसे मिळतील या आशेने शेतकऱ्यांनी झेंडूच्या बागा लावल्या आहेत. कसबे सुकेणेची या
शेतीमुळे गेल्या काही वर्षांपासून देशभरात नवी ओळख तयार झाली आहे.
कमी पावसामुळे यंदा फूल शेतीलाही फटका बसला असून प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी फुलबागा जगविल्या आहेत
त्यामुळे झेंडू व गुलाबाच्या उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे.
(वार्ताहर)