...मराठी असे आमुची मायबोली !

By Admin | Updated: February 28, 2017 23:15 IST2017-02-28T23:15:41+5:302017-02-28T23:15:59+5:30

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो.

Marathi is such a language! | ...मराठी असे आमुची मायबोली !

...मराठी असे आमुची मायबोली !

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालयांत काव्यमैफल, नाट्यप्रवेश, गीतगायन, नृत्य, वक्तृत्व आदि विविध उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते. ठिकठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात मराठी भाषिक सहभागी झाले होते. नाशिक : महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. तुषार चांदवडकर होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. यू. बी. पूरकर होत्या. चांदवडकर यांनी कुसुमाग्रजांचे बालपण, साहित्यसंपदा, काव्य, प्रवासवर्णन, नाटक, बालगीत संग्रह, ऐतिहासिक घटनांचा आढावा घेतला. यावेळी डी. एड.एल. प्रथम वर्ष छात्राध्यापकांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे गायन केले. प्रास्ताविक प्रा. साहेबराव ठाकरे यांनी केले.
सीएमसीएस महाविद्यालय
सीएमसीएस महाविद्यालयात कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे होते. याप्रसंगी प्रा. पी. आर. वावीकर, प्रा. ए. के. कारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. पी. बी. निकम आदि उपस्थित होते. संध्या जगताप यांनी कुसुमाग्रजांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडून दाखविला. सूत्रसंचालन प्रा. एस. डी. रायते यांनी केले. प्रा. आर. ए. तोरणे यांनी आभार मानले.
शिशुविहार बालक मंदिर
सेंट्रल हिंदू सैनिकी शिक्षण संचालित, शिशुविहार बालक मंदिर येथे कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शब्दकोडे सोडवलीत, तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांना विविध शब्द मराठीत सांगून प्रश्नमंजूषा घेण्यात आली. याप्रसंगी रिमा जोशी, मानसी कुलकर्णी, मुख्याध्यापक साक्षी भालेराव आदि उपस्थित होते.
सुभाष वाचनालय
जुने नाशिक परिसरातील सुभाष सार्वजनिक वाचनालयात प्रमुख अतिथी म्हणून देना बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी एकनाथ महाजन उपस्थित होते. तसेच वाचनालय कुसुमाग्रजांच्या साहित्याचे ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रभाकर खंदारे होते. प्रारंभी वाचनालयाचे ग्रंथपाल दत्ता पगारे प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व कवि कुसुमाग्रज यांच्या सुभाष वाचनालयावरील प्रेमाच्या काही आठवणी सांगितल्या. आभार प्रदर्शन वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह मारुती तांबे यांनी केले.
आदर्श इंग्लिश स्कूल
बाल विद्या प्रसारक मंडळ संचलित, आदर्श सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाचवीतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून ‘ग्रंथदिंडी’ काढली. संत ज्ञानेश्वर महाराज लिखित पवित्र ग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ला वंदन करण्यात आले. यावेळी सर्व वर्गात दृकश्राव्य माध्यमाद्वारे ‘लाभले आम्हास भाग्य’ हे मराठी दिन गीत दाखविण्यात आले. त्यानंतर इयत्ता सातवीतील मल्हार चौधरी याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच इयत्ता आठवीतील सलोनी नाईक, श्रद्धा गायकवाड यांनी मी मराठी हे गीत सादर केले. त्यानंतर शिक्षिका रसिका भालेराव यांनी मराठी दिनाचे महत्त्व सांगितले.
वाघ सेकंडरी स्कूल, ज्यु. कॉलेज
येथील वाघ विद्यालयात मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी नाटिका, काव्यवाचन, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य सादर करण्यात आले. इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. शाळेत शारदोत्सव साजरा करण्यात आला. ग्रंथ दिंडीचे आयोजन करून परिसरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. ‘वाचाल तर वाचाल’ अशा घोषणा देण्यात आल्या. यात विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतून वेशभूषा त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, वासुदेव, जिजाऊ, कोळी नृत्य, शेतकरी अशा विविध पैलूंची गुंफण मराठी दिनाच्या निमित्ताने करण्यात आली.
रायन इंटरनॅशनल स्कूल
येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये राजभाषा दिन उत्साहात साजरा झाला. या दिवसाची सुरुवात मराठी परीपाठाने झाली. सर्व व्यवहार मराठी भाषेतच करण्यात आले. यावेळी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कवी किशोर पाठक उपस्थित होते. पाहुण्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
लोकमान्य वाचनालय, सिडको
जुने सिडकोतील लोकमान्य वाचनालयात कविवर्य कुसुमाग्रज जयंतीनिमित्त माय मराठी गौरव दिन सोहळा साजरा करण्यात आला़ या कार्यक्रमप्रसंगी मानवधन शैक्षणिक संस्थेचे संस्थापक प्रा. प्रकाश कोल्हे यांनी सांगितले की, मायमराठीचे आपल्यावर अथांग ऋण असून मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व जीवनाच्या सर्व क्षेत्रात मराठी भाषेचा कटाक्षाने वापर नितांत आवश्यक आहे़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे संस्थापक प्राचार्य रघुनाथराव कुलकर्णी होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्ञानकट्ट्याचे उद््घाटन करण्यात आले. महिन्यातून एकदा ज्ञानकट्ट्यावर काव्ये, साहित्य, कला, क्रीडा, संगीत या विषयांवर ज्ञानचर्चा व वाचन संस्कृतीला पुष्ट करणारे कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावळीराम तिदमे यांनी केले. ग्रंथपाल आकांक्षा देशपांडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.

आठवणीतले कुसुमाग्रज अन् ग्रंथप्रदर्शन यशस्वी
नाशिक : संस्कृती वैभव संचलित कुसुमाग्रज वाचनालय आणि ‘जनस्थान व्हॉट््स अ‍ॅप ग्रुप’च्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी ‘आठवणीतले कुसुमाग्रज’ कार्यक्रमात विविध मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ग्रंथ प्रदर्शनासही वाचकांनी उत्स्फूर्त प्र्रतिसाद दिला. संस्कृती वैभवचे कुसुमाग्रज वाचनालय, रचना ट्रस्ट इमारत, सावरकरनगर येथे आयोजित या कार्यक्रमात नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, ज्येष्ठ कवी किशोर पाठक, सदानंद जोशी आणि जयप्रकाश जातेगावकर, नवीन तांबट आदि विशेष निमंत्रित होते. सर्वांनीच कुसुमाग्रजांविषयीच्या आठवणीसंबंधी उपस्थितांबरोबर संवाद साधला तसेच यावेळी त्यांच्या लोकप्रिय कविता, त्यांची गाजलेली नाटके व इतर साहित्य याविषयी चर्चा झाली. यानिमित्ताने तात्यासाहेबांबरोबर अनुभवलेल्या आठवणींना उजाळा मिळाला. संस्कृती वैभवचे अध्यक्ष नंदन दीक्षित यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या इतर उपक्रमांचीही माहिती दिली.

 

Web Title: Marathi is such a language!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.