मराठी व्यवहारसापेक्ष व्हावी

By Admin | Updated: February 14, 2015 00:16 IST2015-02-14T00:15:48+5:302015-02-14T00:16:00+5:30

चर्चासत्रातील सूर : मराठी भाषाविषयक धोरण मसुद्यावर मान्यवरांच्या सूचना

Marathi should be reliably | मराठी व्यवहारसापेक्ष व्हावी

मराठी व्यवहारसापेक्ष व्हावी

नाशिक : शाळेत शिकवली जाणारी, शासकीय कामकाजात वापरली जाणारी मराठी भाषा व्यवहारसापेक्ष व्हावी, मराठी भाषेच्या विकासासाठी प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा, असा सूर चर्चासत्रात निघाला. मराठी भाषाविषयक धोरण मसुद्यावर अनेकविध शिफारशी व सूचनांचा या चर्चासत्रात पाऊस पडला.
राज्य शासनाच्या वतीने पुढील पंचवीस वर्षांसाठीचे मराठी भाषाविषयक धोरण प्रसिद्ध झाले असून, त्यावर शिफारशी, हरकती व सूचना मागवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग व एसएमआरके महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी होते. शासनाचे प्रतिनिधी विनय मावळणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. सुसंस्कृत माणूस निर्माण करणे हेच कोणत्याही शिक्षणाचे प्राथमिक धोरण असावे. मराठी भाषा विकासासाठी प्रत्येक शाळांमध्ये परिसंवाद आयोजित करावेत, प्रत्येक मराठी शिक्षकाने एकतरी पुस्तक अनुवादित करावे, असे मत डॉ. गोसावी यांनी व्यक्त केले. विनय माळवणकर यांनी मराठी भाषा धोरणाविषयी शासनाची भूमिका स्पष्ट केली.
चर्चासत्राच्या प्रथम सत्राच्या प्रमुख वक्त्या प्रा. जयश्री पाटणकर या होत्या. मालाडचे प्रा. राजाराम जाधव, प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य, ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. मोहिनी पेठकर यांनी समन्वयाचे काम पाहिले. दुसऱ्या सत्रात केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. एकनाथ पगार, पत्रकार दीप्ती राऊत यांच्यासह प्रा. डॉ वृंदा भार्गवे, प्रा. डॉ. इंदिरा आठवले यांनी मते मांडली. डॉ. अरुणा दुभाषी यांनी समन्वयाचे काम पाहिले. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. बी. पंडित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Marathi should be reliably

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.