इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठीची गोडी
By Admin | Updated: February 27, 2017 00:31 IST2017-02-27T00:30:50+5:302017-02-27T00:31:06+5:30
नाशिक : इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेची पुस्तके वाचनाची गोडी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठीची गोडी
नाशिक : एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होत असूनही अद्याप त्याला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यातच बहुतांश पालकांची आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी धडपड चाललेली असताना इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मात्र मराठी भाषेची पुस्तके वाचनाची गोडी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तसेच पुस्तक प्रदर्शनातून आणि वाचनालयामधूनदेखील मराठी भाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक मुलांसाठी आपल्या मायमराठीचीच पुस्तके नेताना दिसतात, असे मत मराठा भाषा अभ्यासकांनी व्यक्त केले.
आधुनिक काळात इंटरनेट फेसबुक, ट्विटर आणि मोबाइलवरील विविध अॅप्स यामुळे समाज जीवनाचा दैनंदिन आचार, विचार आणि उच्चार म्हणजे भाषेचा ढाचाच बदलून गेल्याचे दिसून येते. त्यातच मराठी भाषेला अवकाळ आली असून, ती शेवटची घटका मोजत आहे, असे गेल्या २0 ते २५ वर्षांपासून म्हटले जात आहे. भाषेतील कला, साहित्य आणि अन्य माध्यमांकडून याबाबत भीतीदायक चित्र उभे केले जात होते. परंतु आता ही भीती दूर झाली असून, मराठी भाषेला काहीही धोका नाही किंबहुना असा धोका नव्हता. यासंबंधी चर्चा करताना मराठी भाषा व संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. प्रा. सदानंद मोरे यांनी सांगितले की, मराठी भाषा ही जगातील १७व्या क्रमांकाची भाषा असून, तिचा उगम मध्यमयुगीन मानला जात असला तरी इ.स.च्या पहिल्या शतकापासून या भाषेचे पुरावे सापडतात. त्यामुळे मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे.
मराठी भाषेच्या सद्यस्थितीबद्दल भाष्य करताना मराठी विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. विजया वाड म्हणाल्या की, मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराची सुरुवात आपल्या कुटुंबापासूनच व्हायला हवी. मुलांना मराठीतील चांगली पुस्तके वाचनासाठी द्यायला हवीत. साने गुरुजी, विनोबा भावे, विं. दा. करंदीकर, आचार्य अत्रे, कुसुमाग्रज आदिंची पुस्तके मुलांनी आणि पालकांनी अवश्य वाचली पाहिजे आणि पुस्तक प्रदर्शन तसेच वाचनालयातून मराठी माध्यमातील मुलांबरोबर इंग्रजी माध्यमातील आपल्या मुलांसाठीही पालक मराठीची पुस्तके मोठ्या प्रमाणावर नेतात, असा सुखद अनुभव आहे. यासंबंधी नाशिकमधील सार्वजनिक वाचनालय नाशिक, कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय, टिळक वाचनालय, सुभाष वाचनालय, मृत्युंजय वाचनालय, शासकीय कर्मचाऱ्यांचे वाचनालय आदि वाचनालयांत मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषिक पुस्तके असून, त्यापैकी ८0 टक्के वाचकांकडून मराठी पुस्तकांनाच मागणी असते.