मराठा मोर्चाला अन्य समाजबांधवांची मदत
By Admin | Updated: September 22, 2016 01:35 IST2016-09-22T01:35:22+5:302016-09-22T01:35:55+5:30
नाशिककरांचा प्रतिसाद : पुरविणार आवश्यक सुविधा

मराठा मोर्चाला अन्य समाजबांधवांची मदत
नाशिक : मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेला मराठा समाजाचा संयम, शासन प्रशासनासोबत विद्यमान समाजव्यवस्थेलाही चांगलाच भावला आहे. त्यामुळेच नाशिककरांनी मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा समाजबांधवांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी जातिपातीचा भेद विसरून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविला आहे. कोपर्डी बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ शनिवारी (दि.२४) मोर्चा मार्गावर मोर्चेकरी महिला भगिनींची नैसर्गिक विधी व अन्य आवश्यक समस्या लक्षात घेऊन अनेक स्थानिक रहिवाशांनी स्वत:च्या घरातील बाथरूम वापरण्याची मुभा दिली आहे. नाशिककरांच्या सहकार्याच्या भूमिकेमुळे अनेक महिलांची मोठी अडचण दूर होणार आहे. तपोवन, आडगाव नाका, निमाणी, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, कलेक्टर कार्यालय या मोर्चा मार्गावर राहणाऱ्या बांधवांना मराठा मोर्चा स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष भेटून अशाप्रकारे महिलांच्या सोयीसाठी केलेल्या आवाहनाला नाशिककरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. मोर्चात सहभागी पुरुषांसाठीही विविध प्रकारची कार्यालये, संस्था, हॉटेल्सचे प्रसाधन गृह उपलब्ध करून दिले आहेत. यात सेवाकुंज ट्रस्टची धर्मशाळा, निमाणी ट्रस्टचे मंगल कार्यालय, लक्ष्मण रेखा सोसायटी, राठी संकुल, काट्या मारुती परिसरातील मार्गावरील घरे, दुकाने, कार्यालये, हॉटेल्स अशा विविध व्यावसायिकांसह परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात दिला आहे. मोर्चात पाण्याच्या पाकिटांचे वाटप करण्यात येणार असून त्या प्रत्येक ठिकाणी एक किंवा दोन स्वयंसेवक हजर राहून मार्गदर्शन करतील. मोर्चात अनपेक्षितपणे कोणालाही त्रास जाणवल्यास तातडीने उपचार करता यावेत म्हणून सद्गुरू दवाखाना, सुयोग हॉस्पिटल, सूर्या हॉस्पिटलसह मोर्चा मार्गावरील व जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये काही खाटा राखीव ठेवण्याच्या आवाहनाला डॉक्टरांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सार्वजनिक सुलभ स्वच्छतागृहांची पाहणी करून त्याठिकाणीही आवश्यक त्या सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. या सर्व सुविधांसंदर्भात प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यात येणार असून यासंबंधी स्वयंसेवक मदतीसाठी सज्ज असतील. (प्रतिनिधी) स्वयंसेवकांचे आवाहन मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेला मराठा समाजाचा संयम, शासन प्रशासनासोबत विद्यमान समाजव्यवस्थेलाही चांगलाच भावला आहे. त्यामुळेच नाशिककरांनी मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा समाजबांधवांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी जातिपातीचा भेद विसरून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविला आहे. मदतीसाठी स्वयंसेवक तुषार जगताप, राहुल जाधव, संदीप लभडे, बबलू अडकमोल, राकेश सूर्यवंशी, दीपक जगताप, राजाभाऊ नाईकवाडे, विशाल कोशिरे, आकाश जगताप, प्रितेश जुन्नरे, आशुतोष यशोद, विकी पवार, योगेश कापसे, अमोल वडजे, योगेश नाटकर आदि स्वयंसेवकांनी संघटित फेरी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले.