मराठा मेडिकोजची ठिकठिकाणी ‘आरोग्यसेवा’
By Admin | Updated: September 25, 2016 00:07 IST2016-09-25T00:06:45+5:302016-09-25T00:07:14+5:30
मराठा मेडिकोजची ठिकठिकाणी ‘आरोग्यसेवा’

मराठा मेडिकोजची ठिकठिकाणी ‘आरोग्यसेवा’
नाशिक : मराठा क्रांती मोर्चानिमित्त तपोवनापासून ते थेट गोल्फ क्लब मैदानापर्यंत ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मराठा क्रांती मोर्चासह मराठा मेडिकोज असलेले छोटे छोटे सेवा केंद्र उभारण्यात आले होते. या सेवा केंद्रांतून मोर्चेकऱ्यांना पाणी पिशवी तसेच पोह्यांचा नाश्ता तसेच औषध गोळ्यांचे वाटप करण्यात येत होते.
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या या मराठा मेडिकोजची संख्या ६० ते ७०च्या घरात होती. रविवार कारंजा येथे ३० क्रमांकाच्या मराठा मेडिकोज सेवा केंद्रात औषधांसह पिण्याच्या पाण्याच्या पिशव्या तसेच नाश्त्याचे वितरण करण्यात येत होते. रविवार कारंजापासून पुढे पेठे हायस्कूलनजीक मराठा मेडिकोज सेवा केंद्रात पाण्याच्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले होते. धुमाळ पाइंट ते मेहेर सिग्नल दरम्यान महात्मा गांधी रस्त्यावर अशाच मराठा मेडिकोज सेवा केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पिण्याच्या पाण्याच्या पिशव्यांचा साठा पांढऱ्या गोण्यांमध्ये महात्मा गांधी रस्त्यावर काही रिकाम्या गाळ्यांमध्ये तसेच कॉँग्रेस कमिटीच्या मोकळ्या जागेत करण्यात आला होता. त्र्यंबक नाका सिग्नलपासून ते थेट गोल्फ क्लब मैदानापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा मेडिकोज सेवा केंद्रात नाश्ता व पिण्याच्या पाण्याच्या पिशव्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चात सहभागी लाखो समाज बांधवांना या पाण्याचा मोठा आधार झाला. ढगाळ हवामान असले तरी दमट व उकाडा असल्याने अनेकांनी आपली तहान या मराठा मेडिकोजच्या थंड पाण्याच्या पिशव्यांवर भागविली. (प्रतिनिधी)