सराईत गुन्हेगार कुंदन परदेशीसह १७ जणांवर मोक्का
By Admin | Updated: July 8, 2016 21:00 IST2016-07-08T21:00:59+5:302016-07-08T21:00:59+5:30
शहरात गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढलेल्या कारवाया व आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या

सराईत गुन्हेगार कुंदन परदेशीसह १७ जणांवर मोक्का
नाशिक : शहरात गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढलेल्या कारवाया व आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे़ याचाच एक भाग म्हणून पंचवटीतील सराईत गुन्हेगार कुंदन परदेशीसह त्याच्या १७ साथीदारांवर पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम कायद्यान्वये (मोक्का) शुक्रवारी (दि़८) कारवाई केली आहे़
पोलीस आयुक्तांनी यापूर्वी सिडकोतील टिप्पर गँग, पंचवटीतील राकेश कोष्टी गँगवर मोक्कान्वये कारवाई केली आहे़, तर या कायद्यान्वये कारवाई करण्यात येणारी शहरातील ही तिसरी गुन्हेगारी टोळी आहे़ या कायद्यान्वये सराईत गुन्हेगार कुंदन सुरेश परदेशी, मयूर शिवराम कानडे, मयूर गोपाल भावसार, आकाश विलास जाधव, अजय जेठा बोरिसा, अक्षय कैलास इंगळे, प्रवीण भारत राजपूत, रवींद्र दगडूसिंग परदेशी, अर्जुन परदेशी, गणेश भास्कर कालेकर, राकेश तुकाराम कोष्टी, व्यंकटेश नानासाहेब मोरे, किरण दिनेश नागरे, करण रवींद्र परदेशी, जयेश हिरामण दिवे यांचा समावेश आहे़
सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी व त्याच्या साथीदारांवर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, जबरी लूट, मारहाण, अपहरण, खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत़ २७ मे रोजी जुन्या भांडणाची कुरापत काढून परदेशी व त्याच्या १७ साथीदारांनी पंचवटीतील हनुमानवाडी कॉर्नरवरील भेळभत्ताविक्रेता सुनील रामदास वाघ याचा खून, तर त्याचा भाऊ हेमंत वाघ यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता़ याप्रकरणी परदेशीसह त्याच्या साथीदारांवर पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हादेखील दाखल आहे़
पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन, पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, विजय पाटील, सहायक पोलीस आयुक्तसचिन गोरे, विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर, पोलीस उपनिरीक्षक व्ही़ एस़ जोनवाल व पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली़ शहरातील बहुतांशी गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख म्होरके व त्यांचे साथीदार या कायद्यान्वये किमान सहा महिने मध्यवर्ती कारागृहात जेरबंद असल्याने नाशिककरांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे़.
गुन्हेगारांच्या पाठीराख्यांवर नजर
शहरातील सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांना राजकीय आश्रय असून, त्यांच्याकडून आर्थिक व कायदेशीर मदत केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे़ त्यानुसार या गुन्हेगारांना सहाय्य करणारे राजकीय पदाधिकारी तसेच नागरिकांवर करडी नजर ठेवली जाणार आहे़