अनेक गावे वंचित : धान्य वितरण व्यवस्था कोलमडल्याने गरिबांची गैरसोय
By Admin | Updated: February 27, 2015 22:45 IST2015-02-27T22:44:55+5:302015-02-27T22:45:18+5:30
धान्य घोटाळ्याचा दिंडोरीला फटका

अनेक गावे वंचित : धान्य वितरण व्यवस्था कोलमडल्याने गरिबांची गैरसोय
दिंडोरी : सुरगाणा तालुक्यात स्वस्त धान्याचा करोडोचा घोटाळा उघडकीस येऊन त्यात तहसीलदारासह वाहतूक ठेकेदारास झालेल्या अटकेचा फटका दिंडोरी तालुक्यातील गोरगरीब जनतेला बसला असून, ऐन सणासुदीत वितरण व्यवस्था कोलमडल्याने रेशनविना महागडे धान्य घ्यावे लागत आहे. दिंडोरी शहरासह अनेक गावे या महिन्यात रेशनपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
दिंडोरी तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील अनेक कुटुंबे या स्वस्त धान्यावर अवलंबून आहेत. परंतु या महिन्यात धान्यच वितरित न झाल्याने या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील नागरिक रोज धान्य दुकानात जाऊन धान्य आले का याची विचारणा करतात व धान्य न आल्याने त्यांना रिकाम्या हाती माघारी परतावे लागत आहे. शिवाय पुढील चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणालाच स्वस्त धान्य न आल्याने येथील गोरगरीब जनतेला सण कसा साजरा करावा याची चिंता लागली आहे. एकीकडे पाच कोटी रुपयांचा स्वस्त धान्य घोटाळा होतो, तर दुसरीकडे स्वस्त धान्य मिळत नसल्याने गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे, असे चित्र सध्या तालुक्यात बघायला मिळत आहे. स्वस्त धान्य दुकानांत धान्यच शिलक नसल्याने दुकानांच्या बाहेर धान्य आलेले नाही असा फलक लावला जात आहे.
मागील पंधरवड्यात सुरगाणा येथे झालेल्या पाच कोटी रुपयांच्या धान्य घोटाळ्यामुळे तालुक्यात धान्य वितरण करणारी वाहतूक थांबली आहे. रोज सहा वाहने धान्य वितरित केले जात होते; मात्र आता फक्त दोन वाहनांद्वारे वितरण होत आहे. वाहनेच उपलब्ध नसल्याने दुकानदारांना धान्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांत धान्यच शिल्लक राहिले नाही. त्यातच पुन्हा पुरवठा विभागातील हमालांनी वेतनवाढ व करारासाठी पुकारलेल्या संपामुळे वितरण व्यवस्था कोलमडून पहिल्यांदाच पूर्ण महिना धान्याविना अनेक दुकाने बंद आहेत. (वार्ताहर)