गिते कोट्यवधींचे धनी, पण कर्जबाजारी
By Admin | Updated: September 27, 2014 00:56 IST2014-09-27T00:55:59+5:302014-09-27T00:56:54+5:30
उमेदवारांची मालमत्ता : खैरे, बोरस्तेही कोटींची धनी

गिते कोट्यवधींचे धनी, पण कर्जबाजारी
नाशिक : मध्य नाशिकचे आमदार वसंत गिते हे कोट्यवधी रुपयांचे धनी आहेत. त्याचबरोबर त्यांच्या इनोव्हा मोटारीसाठी काढलेले सव्वानऊ लाख रुपयांचे पतसंस्थेचे कर्ज फेडायचे आहे. दुसरीकडे शिवसेनेचे अजय बोरस्ते आणि कॉँग्रेसचे उमेदवार शाहू खैरे हेही कोट्यवधी रुपयांच्या मिळकतीचे धनी आहेत. पैकी खैरेही कर्जबाजारी आहेत.
मध्य नाशिक मतदारसंघातील आमदार वसंत गिते यांनी उमेदवारी अर्जासमवेत प्रतिज्ञापत्र सादर केले असून, त्यात त्यांच्या संपत्तीची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी गुंतवणूक आणि अन्य रक्कम, मोटार, सोनेनाणे धरून गिते यांच्याकडे अशी मालमत्ता १८ लाख ९५ हजार ९०५ रुपये मालमत्ता आहे, तर अन्य जमीन- जुमला, सदनिका यांचा विचार केला तर तीन कोटी ११ लाख रुपयांची मालमत्ता आहे. तथापि, रविवार कारंजा सिद्धिविनायक को-आॅप. सोसायटीकडून त्यांनी इनोव्हा खरेदीसाठी कर्ज काढले होते. त्यापैकी नऊ लाख २८ हजार ६१९ रुपयांचे कर्ज फेडणे अद्याप बाकी आहे. याशिवाय गिते यांच्यावर नऊ गुन्हे दाखल असून, ते न्यायप्रविष्ट आहेत.
कॉँग्रेस उमेदवार शाहू खैरे यांच्याकडील मालमत्ता तीन कोटी पाच लाख ५० हजार रुपये इतकी मालमत्ता दर्शविण्यात आली असून, त्यांंच्यावर एकूण ५२ लाख ५८ हजार १३७ रुपयांचे कर्ज आहे. शिवसेनेचे अजय बोरस्ते यांच्याकडे जंगम मालमत्ता ४२ लाख ३१ हजार ६२६ रुपये असून, स्वत: संपादन केलेली मालमत्ता दोन कोटी ९२ लाख ९१६ रुपये इतकी आहे. एकूण चार कोटी ७६ लाख रुपये मालमत्ता त्यांची व्यक्तिगत असून, वारसाप्राप्त मत्ता १६ लाख ५० हजार रूपये इतकी आहे. तथापि, त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. बोरस्ते यांच्यावर पाच गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. खैरे यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. (प्रतिनिधी)