विजयातून अनेकांना मिळाला ‘धडा’
By Admin | Updated: February 26, 2017 23:29 IST2017-02-26T23:29:19+5:302017-02-26T23:29:40+5:30
प्रवीण आडके : देवळाली कॅम्प एकलहरे गटातून बंडखोर शंकर धनवटे यांच्या विजयाकडे निव्वळ विजय म्हणून पाहता येणार नाही तर शिवसेना हरली आणि शिवसैनिक जिंकले असेच म्हणावे लागेल.

विजयातून अनेकांना मिळाला ‘धडा’
प्रवीण आडके : देवळाली कॅम्प
एकलहरे गटातून शिवसेनेचे बंडखोर शंकर धनवटे यांच्या विजयाकडे निव्वळ विजय म्हणून पाहता येणार नाही तर याच गटात खासदारपुत्र अजिंक्य गोडसे यांचा पराभव त्यांनी केल्याने शिवसेना हरली आणि शिवसैनिक जिंकले असेच म्हणावे लागेल.
खासदार हेमंत गोडसे यांचे चिरंजीव अजिंक्य गोडसे यांना शिवसेनेचे जिल्हा परिषद निवडणुकीचे तिकीट जाहीर होताच सेनेचेच शंकर धनवटे समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. धनवटे यांचे तिकीट मुद्दाम कापण्यात आले, असा आरोप करीत एकलहरा गावातील धनवटे समर्थकांनी गाव बंद करून एकप्रकारे आपली नाराजी दर्शविली होती. पक्षीय कामकाज करूनही तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्यांनाही पक्षाने विचारले नाही. परिणामी नाराज शिवसैनिकांच्या बळावर धनवटे यांनी अपक्ष उमेदवारी केली आणि गोडसे यांना आव्हानच दिले. धनवटेंसोबत काही सेनेचे पदाधिकारी, नातेगोते आणि मित्रपरिवार होताच; त्यातच माजी खासदार राजाभाऊ गोडसे हे धनवटे यांच्याबरोबरीने उभे राहिल्याने कार्यकर्त्यांना बळ मिळाले आणि कार्यकर्ते कामाला लागले. निष्ठावंतांना डालण्याच्या भावनेतूनच सारे सैनिक एकवटले आणि त्याचा परिणाम विजयात परावर्तीत झाला.
धनवटे यांनी अपेक्षेप्रमाणे एकलहरा गणातून २७९६ मतांची आघाडी घेऊन विजय निश्चित केला होता. लहवित गणातून सरासरी बेलतगव्हाण या दोन गावांसह अजिंक्यला फक्त सात मतदान केंद्रांत आघाडी घेता आली. लहवित गणात गोडसे यांना ४८९२ तर धनवटे यांना ४०५५ असे मते पडली. या गणात गोडसे यांनी ८३७ मतांची आघाडी घेतली मात्र आघाडी कायम राहू शकली नाही. याउलट धनवटे यांनी लहवित गणात १३ मतदान केंद्रावर निर्णायक आघाडी घेतली. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी लहवित गावात अपेक्षेप्रमाणे २६३१ मते घेतली याचाच फायदा धनवटे यांना झाला. एकलहरा गणात सरपंच अनिल जगताप हे पहिल्यापासून धनवटे यांच्यासोबतच राहिले. या गणात राष्ट्रवादीचे बाळासाहेब म्हस्के, शिवसेनेचे सचिन जगताप यापैकी एकाचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र धनवटे फॅक्टरने इतरांचे मनसुबे कोलमडून पडले. लहवित गावातच तीन उमेदवार असल्याने तसेच डॉ. मंगेश सोनवणे यांचा दांडगा संपर्क असल्याने धनवटे गटाच्या ज्योती मोरे यांना कमी मते मिळाली.