अनेक नगरसेवक कुंपणावर

By Admin | Updated: September 10, 2016 01:19 IST2016-09-10T01:19:08+5:302016-09-10T01:19:23+5:30

प्रभाग रचनेची प्रतीक्षा : १० आॅक्टोबरनंतर उलथापालथ शक्य

Many corporators fence | अनेक नगरसेवक कुंपणावर

अनेक नगरसेवक कुंपणावर

 नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांना प्रभाग रचनेची प्रतीक्षा असून प्रारुप प्रभाग रचना दि. १० आॅक्टोबरला प्रसिद्ध झाल्यानंतर बव्हंशी चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत अनेक नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार कुंपणावर आहेत. प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने, सत्ताधारी मनसेसह दोन्ही कॉँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण लागण्याच्या शक्यतेने पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
महापालिकेच्या कोअर कमिटीने प्रारूप प्रभाग रचना तयार केली असून सध्या प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील त्रिस्तरीय समितीकडे तपासणीसाठी आहे. त्यानंतर तो राज्य निवडणूक आयोगाला १२ सप्टेंबरला सादर केला जाणार असून ७ आॅक्टोबरला राखीव जागांसाठी सोडत निघाल्यानंतर दि. १० आॅक्टोबरला प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचवेळी प्रभागांमधील भौगोलिक स्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह विद्यमान नगरसेवक व इच्छुक उमेदवारांना प्रभाग रचनेची प्रतीक्षा लागून आहे. प्रभाग रचनेनंतर राजकीय पक्षांमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत अनेक नगरसेवक कुंपणावर असून प्रभाग रचनेपर्यंत त्यांची भूमिका ‘थांबा आणि प्रतीक्षा करा’ अशीच आहे. तोपर्यंत कोणत्या पक्षात उडी घ्यायची, आपला नेमका प्रतिस्पर्धी कोण असेल, कोणत्या भागात आपली ताकद राहील, याची चाचपणी इच्छुकांनी सुरू केली आहे. प्रभाग रचनेनंतर पक्षांतराला वेग येणार आहे. आतापर्यंत पक्षांतराची सर्वाधिक झळ सत्ताधारी मनसेला बसली आहे. मनसेच्या तब्बल १६ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. तर त्याखालोखाल राष्ट्रवादी आणि माकपच्या प्रत्येकी दोन नगरसेवकांचा समावेश आहे. दोन अपक्षांनीही भाजपाला जवळ केले आहे.

Web Title: Many corporators fence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.