मनमाडकरांनो, ३१ जुलैपर्यंत वाट पाहा

By Admin | Updated: May 27, 2014 16:59 IST2014-05-27T00:29:31+5:302014-05-27T16:59:20+5:30

नाशिक : मनमाड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पाटोदा साठवण तलावाची क्षमता तिप्पट वाढल्याने यापुढे शहराला पाणीटंचाई भासणार नाही;

Manmad, wait till July 31 | मनमाडकरांनो, ३१ जुलैपर्यंत वाट पाहा

मनमाडकरांनो, ३१ जुलैपर्यंत वाट पाहा

नाशिक : मनमाड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पाटोदा साठवण तलावाची क्षमता तिप्पट वाढल्याने यापुढे शहराला पाणीटंचाई भासणार नाही; परंतु या तलावातून वागदर्डी धरणात पाणी सोडण्यात काही तांत्रिक अडचणी असून, त्या कोणत्याही परिस्थितीत दोन महिन्यांत दूर करा, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. ही योजना कार्यान्वित झाल्यास मनमाड शहराला दररोज किंवा दोन दिवसाआड कायमस्वरूपी पाणीपुरवठा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मनमाड शहराला सध्या सतरा ते अठरा दिवसांनी पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पाटबंधारे, महाराष्टÑ जीवन प्राधिकरण, मनमाड नगर परिषदेची संयुक्त बैठक घेतली. गेल्या तीन वर्षांपासून पाटोदा तलावाची साठवण क्षमता वाढविण्याचे काम करण्यात येत असून, त्यात आता १६ एमसीएफटी पाणी साठणार आहे. पाटोदा तलावातून वागदर्डी धरणात पाणी वाहून नेण्यासाठी पाइपलाइन, पंपिंग, जॅकवेल, जलशुद्धीकरण केंद्राचे काम प्रगतिपथावर आहे. मध्यंतरी या कामात संथपणा निर्माण झाल्याची कबुली भुजबळ यांनी दिली. पाटोदा तलावातील पाणी कमी झाल्याशिवाय काम करता येत नसल्यामुळे कामात अडथळे येत असले, तरी आता ही अडचण दूर झाली असून, फक्त १८०० मीटरच्या पाइपलाइनचे काम बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांची शेतीची कामे सुरू करण्यापूर्वीच पाइपलाइनची कामे पूर्ण करावीत व केलेल्या कामाचा दैनंदिन अहवाल सादर केला जावा, अशा सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. आजही पाटोदा साठवण तलावात मनमाड शहरासाठी पाणी राखून ठेवण्यात आले आहे; परंतु विजेचे भारनियमन व वितरण व्यवस्थेतील अडथळ्यांमुळे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांचा ‘अल्टीमेटम’ संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आला असून, ३१ जुलै ही अखेरची तारीख आहे. योजना पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध आहे. हे काम पूर्ण झाल्यास मनमाडकरांना दोन दिवसाआड पूर्ण क्षमतेने पाणी मिळेल, असेही भुजबळ यांनी सांगितले. या बैठकीत विजेच्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली. वागदर्डी धरणाजवळ वीज कंपनीने एक्स्प्रेस फीडर बसविले असले, तरी अपुरा दाब व वीज भारनियमनामुळेही पाणी उचलण्यात अडचणी येत असल्याची बाब मनमाड नगर परिषदेच्या अध्यक्षांनी निदर्शनास आणून दिली असता, येत्या आठ-दहा दिवसांत नवीन फीडर बसविण्याचे आश्वासन देण्यात आले. गेल्या वर्षापेक्षा यंदा मनमाडची स्थिती चांगली असून, गेल्या वर्षी ४५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता; यंदा मात्र एकही टॅँकर नाही, असेही या बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीस नांदगावचे आमदार पंकज भुजबळ, जिल्हाधिकारी विलास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, प्रांत अधिकारी महेश पाटील, नीलेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Manmad, wait till July 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.