मनीषा बोडकेंची बोळवण बांधकाम समितीवरच? स्थायीच्या माघारीसाठी बोडके-थोरेंची शिष्टाई;
By Admin | Updated: November 14, 2014 01:06 IST2014-11-14T01:05:20+5:302014-11-14T01:06:12+5:30
मनीषा बोडकेंची बोळवण बांधकाम समितीवरच?

मनीषा बोडकेंची बोळवण बांधकाम समितीवरच? स्थायीच्या माघारीसाठी बोडके-थोरेंची शिष्टाई;
नाशिक : स्थायी समितीच्या दोन रिक्त जागांसाठी पाच जण रिंगणात असतानाच, संगीता ढगे, सुनीता अहेर व मनीषा बोडके या महिला सदस्य माघारीसाठी राजी झाल्याची चर्चा असून, पैकी मनीषा बोडके यांना स्थायी समितीऐवजी बांधकाम समितीवर सदस्यपद देऊन बोळवण करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मनीषा श्याम बोडके यांनी स्थायी समितीवरून माघार घेण्यासाठी शिक्षण व आरोग्य सभापती किरण थोरे यांचे पती व माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सदस्य गोरख बोडके यांनीच यशस्वी शिष्टाई केल्याची चर्चा आहे. संगीता ढगे यांच्या माघारीचा शब्द यापूर्वीच राजेंद्र ढगे यांच्याकडून अध्यक्ष विजयश्री चुंबळे व उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांना मिळाल्याने कॉँग्रेसच्या सुनीता अहेर व भाजपाच्या मनीषा बोडके यांच्या अर्ज माघारीसाठी राष्ट्रवादीकडून पंढरीनाथ थोरे व गोरख बोडके यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आल्याची चर्चा होती. त्यानुसार बुधवारी पंढरीनाथ थोरे, गोरख बोडके यांची मनीषा बोडके यांचे पती श्याम बोडके यांच्याशी दीड तास चर्चाही झाली. सौ. ढगे, सौ. बोडके व सौ. अहेर यांच्या माघारीबाबत खात्री झाल्यानेच अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी शनिवारी (दि. १५) तातडीने तहकूब झालेली विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे. (प्रतिनिधी)