मनपा आरक्षण सोडतीत अंतर्गत फेरबदल
By Admin | Updated: January 2, 2017 23:18 IST2017-01-02T23:18:18+5:302017-01-02T23:18:42+5:30
नागरिकांचा मागास प्रवर्ग गट : १६ पैकी ७ जागा महिलांसाठी राखीव

मनपा आरक्षण सोडतीत अंतर्गत फेरबदल
मालेगाव : महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी गेल्या २२ डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या आरक्षणात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जागांच्या आरक्षणात अंतर्गत फेरबदल करण्यात आला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातील १६ जागांपैकी सात जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या २२ डिसेंबर रोजी १९ प्रभागांच्या चिठ्ठ्या टाकून नऊ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या होत्या. या आरक्षण सोडतीला निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला होता. मनपाच्या निवडणूक विभागावर आरक्षण सोडतीत अंतर्गत बदल करण्याची नामुष्की ओढावली होती. त्यानुसार आज मनपा आयुक्त रवींद्र जगताप, उपआयुक्त प्रदीप पठारे, अंबादास गरकळ, विलास गोसावी, एकलाख अहमद, निवडणूक विभागाचे राजेंद्र खैरनार यांच्या उपस्थितीत नागरिकांचा मागास प्रवर्गातील १६ जागांपैकी सात जागा महिला राखीव करण्यासाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. दरम्यान, या आरक्षण सोडतीवर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. राजकीय दबावामुळे आरक्षण सोडतीत फेरबदल केला असल्याचा आरोप किरण मोरे यांनी केला. (प्रतिनिधी)