लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचा भाऊ विजय कोकाटे यांना झालेली दोन वर्षांची शिक्षा अमलात आणण्यावर सोमवारी तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे सुनावणी संपेपर्यंत कोकाटे यांची आमदारकी कायम राहणार आहे. सुनावणी संपेपर्यंत कोकाटे यांना एक लाख रुपयांचा जामीन न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी मंजूर केला. आता शिक्षेच्या स्थगितीवर उद्या, मंगळवारी सुनावणी हाेईल.
मागील आठवड्यात कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. याविरोधात कोकाटे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात अपील केले. कोकाटे यांचे वकील ॲड. अविनाश भिडे यांनी सांगितले की, अपील प्रकरण संपेपर्यंत शिक्षेला स्थगिती व जामीन मिळाला आहे. सरकारी वकील मंगळवारी आपली बाजू मांडतील. माजी मंत्री स्व. तुकाराम दिघोळे यांची मुलगी अंजली यांचे म्हणणे ऐकून घेण्यास न्यायालयाने असहमती दर्शवली.