नाशिक: कर्जमाफीसह शासकीय मदतीबाबत शेतकऱ्यांकडून होणाऱ्या कथित विनियोगाबाबतच्या वक्तव्यामुळे टीकेचे धनी ठरलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर काळाराम मंदिरात श्रीरामाच्या साक्षीने दिलगिरी व्यक्त केली. रामनवमीनिमित्त रविवारी (दि. ६) काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले असता ते बोलत होते.
यावेळी माणिकराव कोकाटे म्हणाले, मी केलेल्या विधानामुळे शेतकऱ्यांचा भावना दुखावल्या गेल्या आहेत. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी गांभीर्याने काम करीत असून त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्या भेडसावणार नाहीत याकडे आमचे लक्ष असल्याचे ते म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांना आणि जनतेला चांगले दिवस येवोत ही प्रार्थना रामाकडे केली असून अवकाळीबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचेही ते म्हणाले.