रोनितच्या स्मरणार्थ कॅण्डल मार्च
By Admin | Updated: October 9, 2015 23:53 IST2015-10-09T23:52:22+5:302015-10-09T23:53:19+5:30
रोनितच्या स्मरणार्थ कॅण्डल मार्च

रोनितच्या स्मरणार्थ कॅण्डल मार्च
नाशिक : शाळेतून परतत असताना बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या रोनित चौहान या अडीच वर्षीय बालकाच्या स्मरणार्थ पंचवटीकरांनी कॅण्डल मार्च काढला. ज्या सेवाकुंज चौकात रोनितचा मृत्यू झाला त्या चौकात सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी शोकमग्न चौहान कुटुंबीयांनी केली.
गणेशवाडी येथून सायंकाळी ६ वाजता कॅण्डल मार्चला सुरुवात झाली. यात पंचवटीतील हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. तत्पूर्वी चौहान यांच्या निवासस्थानी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर येथून कॅण्डल मार्च काढण्यात आला. गणेशवाडीत देवी चौक, काट्या मारुती पोलीस चौकीमार्गे सेवाकुंज चौकातील संकटविमोचन हनुमान मंदिरात कॅण्डल मार्चचा समारोप करण्यात आला.
यावेळी आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, पंचवटी प्रभाग सभापती सुनीता शिंदे, देवांग जानी आदिंसह परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. रोनितचे आई-वडील त्याची प्रतिमा घेऊन कॅण्डल मार्चच्या अग्रभागी होते. तसेच परिसरातील शाळांचे विद्यार्थीही कॅण्डल घेऊन या मार्चमध्ये सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करीत रोनितला श्रद्धांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)