मंदा निकम सभापती, उपसभापतिपदी ढिकले
By Admin | Updated: September 16, 2014 23:55 IST2014-09-15T00:43:02+5:302014-09-16T23:55:39+5:30
मंदा निकम सभापती, उपसभापतिपदी ढिकले

मंदा निकम सभापती, उपसभापतिपदी ढिकले
नाशिक : पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत सभापतिपदाची निवडणूक वगळता उपसभापतिपदासाठी अखेरपर्यंत चुरस निर्माण होऊन मावळते सभापती अनिल ढिकले यांची उपसभापतिपदी निवड झाली.
नाशिक पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्ग (महिला) राखीव असल्याने आणि या संवर्गातून राष्ट्रवादीकडून मंदाबाई सुखदेव निकम या एकमेव सदस्य निवडून आलेल्या असल्याने त्यांची निवड अपेक्षित मानली जात होती. पंचायत समितीच्या कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीत पीठासन अधिकारी तथा तहसीलदार गणेश राठोड व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. सुरुवातीलाच सदस्य मंदाबाई निकम या पती सुखदेव निकम व सदस्य धनाजी पाटील तसेच राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष तानाजी गायधनी यांच्याबरोबर सभागृहालगतच्या इमारतीत बसल्या होत्या. पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर बरोबर दुपारी बारा वाजता राखाडी रंगाच्या फॉर्च्युनर वाहनातून (एमएच १५ - १४७०) शिवसेनेच्या महिला पदाधिकारी शोभा गटकळ तसेच मावळते सभापती अनिल ढिकले, मनसेच्या सदस्य शोभा लोहकरे व सुशीला वाघेले पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ येताच राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या सदस्यांनी हे वाहन रोखण्याचा प्रयत्न केला. वाहनात कॉँग्रेसचे सदस्य प्रकाश बदादे असल्याचे सांगत बदादे यांच्या पत्नी व मुलगा संजय बदादे यांनी वाहनासमोर आडवे येण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला. मात्र राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे कार्यकर्ते वाहन पुढे जाऊ देण्यास तयार नव्हते. त्याचवेळी सेनेचा फौजफाटा तेथे पोहोचला. जगन आगळे, बंटी तिदमे, दिलीप चव्हाण, संजय तुंगार यांनी हे वाहन सभागृहापर्यंत सोडण्यासाठी रेटा लावला. त्याचवेळी सेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून सौम्य लाठीमार करत संजय बदादे याला ताब्यात घेतले. त्यानंतर बरोबर १ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे गणेश राठोड यांनी सांगितले. सभापतिपदासाठी मंदाबाई निकम यांचा एकमेव, तर उपसभापति-पदासाठी राष्ट्रवादीचे धनाजी पाटील व कॉँग्रेसचे अनिल ढिकले यांचा असे दोन अर्ज प्राप्त झाले. छाननीत दोन्ही अर्ज वैध असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले. त्यानंतर १.१५ ते १.३० दरम्यान अर्ज माघारीच्या वेळेत धनाजी पाटील यांनी अर्ज माघार घेतला.
अर्ज माघारीनंतर धनाजी पाटील व मनसे पुरस्कृत अपक्ष कैलास चव्हाण यांनी तडक सभागृह सोडले. त्यानंतर सभापती व उपसभापतिपदासाठी एकेक अर्ज प्राप्त झाल्याने सभापतिपदी मंदाबाई निकम, तर उपसभापतिपदी अनिल ढिकले यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा गणेश राठोड यांनी केली. निवड झाल्यानंतर पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनिल ढिकले यांना उचलून घेत घोषणाबाजी केली. (प्रतिनिधी)