कामातील पारदर्शकतेमुळेच मनपाचे अॅप्स
By Admin | Updated: September 15, 2015 23:48 IST2015-09-15T23:48:24+5:302015-09-15T23:48:52+5:30
राज ठाकरे : स्मार्ट सिटी संकेतस्थळासह संगणकीय कार्यप्रणालीचे लोकार्पण

कामातील पारदर्शकतेमुळेच मनपाचे अॅप्स
नाशिक : आपला कारभार कसा चालला आहे, हे कुणी सांगत नाही; परंतु नाशिक महापालिकेच्या कामात पारदर्शकता आहे म्हणूनच मोबाइल अॅप्लिकेशन लोकांसमोर आले आहे. यापुढे आणखी चांगल्या गोष्टी शहरात घडताना दिसतील. नाशिकचे अनुकरण इतरांनीही करावे, यासाठी सारे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक महापालिकेने तयार केलेल्या मोबाइल अॅप्लिेशनच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना केले.
महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित सोहळ्यात महापालिकेचे मोबाइल अॅप्लिकेशन, संगणकीय कार्यप्रणाली आणि स्मार्ट सिटी संकेतस्थळाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात नाशिक शहरात झालेल्या आणि सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देतानाच भविष्यात होणाऱ्या प्रकल्पांचाही वेध घेतला. ठाकरे यांनी सांगितले, नाशकात काहीच काम झाले नसल्याची ओरड होते; परंतु महापालिका हाती दिली आहे, तर पूर्ण पाच वर्षे झाल्यानंतरच काय ते विचारा. वनौषधी उद्यानाचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे. खूप वर्षांपूर्वी मी नेहरू उद्यानाची जागा पाहिली होती. तेथे काहीच केले नाही तर झोपड्या उभ्या राहतील. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी तेव्हाचे वनमंत्री पतंगराव कदम यांना भेटलो. अधिकाऱ्यांशी चर्चा केली; परंतु यापूर्वी असे काही झाले आहे काय, असा ठरलेला प्रश्न पुढे आला. चांगल्या कामांच्या बाबतीतच असा प्रश्न विचारला जातो. लग्नाच्या बाबतीत विचारतील काय? अनुभव आहे का म्हणून? दरम्यान, सरकार बदलले आणि सुधीर मुनगंटीवार यांना प्रकल्प समजावून सांगितला. त्यांनी संमती दिली आणि टाटा फाउण्डेशनच्या माध्यमातून आता वनौषधी उद्यानाचे काम सुरू झाले आहे. त्याच ठिकाणी डोंगराभोवती साडेचार ते पाच कि.मी.चा सायकल ट्रॅक बनवतो आहे. गोदापार्कही बनतो आहे. गोदावरीत जिनिव्हा फाऊंटन साकारला जाणार आहे. महिलांसाठी बॅडमिंटन कोर्ट उभे राहणार आहे. ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्कचेही येत्या २६ रोजी उद्घाटन होणार आहे. दुर्मिळ शस्त्रास्त्रांचेही म्युझियम साकार होणार आहे. मुकणे धरणाचेही काम विरोधकांनी अडवून धरले होते. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर आता त्यालाही चालना मिळाली आहे. यापुढे आणखी काही योजना आणतो आहे. कामे दिसायला लागली आहेत. मात्र, झालेल्या कामांबद्दल शाबासकीची थाप द्यायलाही विसरू नका, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. तत्पूर्वी, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मोबाइल अॅप्सच्या कार्यप्रणालीचे सादरीकरण केले.