फ्लॅट नावावर करण्यासाठी एकाचे अपहरण करून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:32 IST2017-09-09T23:32:24+5:302017-09-09T23:32:30+5:30

फ्लॅट नावावर करण्यासाठी एकाचे अपहरण करून मारहाण
इंदिरानगर : फ्लॅट नावावर करून घेण्यासाठी तिघा संशयितांनी एकाचे अपहरण व मारहाण करून रोख रक्कम लंपास केल्याचा प्रकार इंदिरानगरमध्ये घडला आहे़ मुजाहिद अहमद खान ऊर्फ मुकेश गुप्ता असे अपहरण करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे़ याप्रकरणी संशयित आयुब खान, बबलू खान व त्यांच्या एका साथीदाराच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गुप्ता यांचा विवाह रेहाना ऊर्फ सबाना इजाहार खान हिच्याशी झाला होता. त्यानंतर काही वर्षांतच हे दोघे जण वेगवेगळे राहू लागले. गुप्ता यांच्या मालकीचे चार फ्लॅट असून, यातील तीन फ्लॅटवर रेहाना व तिच्या नातेवाइकांनी कब्जा केला आहे. फिर्यादी यांचा पार्क साईट येथे असलेला फ्लॅट हा रेहानाच्या नावावर करून देण्याची मागणी वारंवार केली जात होती़
पांडवनगरी येथील एका दुकानात गुप्ता मित्रांसमवेत उभे असताना अचानक रेहानाचा भाऊ आयुब इजाहार खान याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गुप्ता यांना गाडीवर बसवून सातपूरला नेले़ यानंतर दवाखान्यात उपचार केल्यावर गुप्ता यांना संशयित आरोपी आयुब याने अंबड पोलीस ठाण्यात नेले. या ठिकाणी गुप्ता याने विश्वासाने पोलिसांना सविस्तर माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या दोघांना इंदिरानगर पोलीस ठाण्यात आणले.