अभाविप विरूद्ध माळी महासंघ आक्रमक
By Admin | Updated: December 5, 2015 23:34 IST2015-12-05T23:33:44+5:302015-12-05T23:34:23+5:30
अभाविप विरूद्ध माळी महासंघ आक्रमक

अभाविप विरूद्ध माळी महासंघ आक्रमक
सिडको : पुणे येथे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी घातलेल्या गोंधळाचा माळी समाज महासंघाने निषेध केला असून, धिंगाणा घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर राज्य सरकारने गुन्हे दाखल करावे अन्यथा संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचे महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अनिल महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तिडकेनगर येथील दुर्वांकूर मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाजन यांनी सांगितले की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या कार्यक्रमात धिंगाणा घातला असून, ही बाब निंदनीय आहे. हिम्मत असेल तर असा धिंगाणा यापुढे करून दाखवा व त्याचे परिणाम बघा, असे आव्हानही यावेळी महाजन यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना दिले. या घटनेस आठ दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही राज्य सरकारने कोणतीच कार्यवाही केली नसल्याने त्यांचाही यावेळी निषेध केला. तसेच या कार्यकर्त्यांवर सरकारने गुन्हे दाखल करावे अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही महाजन यांनी दिला. याप्रसंगी माळी समाज महासंघाचे कार्याध्यक्ष बाजीराव तिडके, राजेंद्र गाडेकर, सदाशिव नाईक, विठ्ठल पवार, किशोर क्षीरसागर, रेखा महाजन आदि उपस्थित होते. (वार्ताहर)