रंगांत रंगण्यासाठी मालेगावकर सज्ज
By Admin | Updated: March 10, 2015 23:00 IST2015-03-10T22:56:18+5:302015-03-10T23:00:44+5:30
रंगांत रंगण्यासाठी मालेगावकर सज्ज

रंगांत रंगण्यासाठी मालेगावकर सज्ज
संगमेश्वर : मालेगाव शहर व तालुका रंगपंचमी सणाच्या स्वागतासाठी व या सणाच्या रंगांत न्हाऊन निघण्यासाठी सज्ज झाला आहे. अवकाळी पावसाचे संकट जरी ओढवले असले, तरी त्यावर मात करत रंगपंचमीच्या तयारीत शहर - तालुक्यातील जनता विशेषत: तरुणवर्ग व बच्चेकंपनी मग्न झाली आहे.
रंगपंचमीनिमित्त शहरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे. येथील गूळबाजार, संगमेश्वर, मोसमपूल, कॅम्प, सोमवार बाजार व सटाणा नाका तसेच मोतीबाग नाका भागात रंगपंचमीनिमित्त अनेक दुकाने सजली आहेत. याठिकाणी रंगपंचमीसाठी लागणाऱ्या विविध आकाराच्या, प्रकाराच्या आणि रंगसंगतीतील पिचकाऱ्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. कार्टून व बंदूक स्वरूपातील अशा पिचकाऱ्यांनी लहान मुलांना विशेष आकर्षित केले आहे. किमान २० ते ५०० रुपयांपर्यंत या पिचकाऱ्यांची किंमत आहे. तसेच लाल, पिवळा, हिरवा, जांभळा, सोनेरी आदि विविध प्रकारचे रंगही बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यंदाच्या रंगपंचमीचे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात रासायनिक रंगांसोबत हर्बल व पर्यावरणपूरक रंगदेखील बघावयास मिळत आहेत. पर्यावरणप्रेमी मालेगावकरांकडून या रंगांच्या खरेदीस विशेष महत्त्व दिले जात आहे.
शहरातील विविध शाळा- महाविद्यालयांमध्ये देखील रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. यंदा शहर - तालुक्यात पाण्याची अजून टंचाई नाही. त्यामुळे रंगपंचमीच्या या उत्सवात पाणीटंचाई जाणवणार नाही. तसेच गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत मनपा प्रशासनातर्फे रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी थोडा वेळ अंघोळीसाठी पाणी सोडले जात असे. ती परंपरा खंडित झालेली आहे. यंदा मनपाने ती परंपरा पुन्हा सुरूकरून संबंधित विभागात सायंकाळी अतिरिक्त पाणीपुरवठा करून रंगपंचमीचा आनंद द्विगुणित करावा, अशी मागणी सर्वसामान्य मालेगावकरांकडून केली जात
आहे.