राज्यात मालेगावला अनोखा आदेश
By Admin | Updated: April 2, 2015 00:29 IST2015-04-02T00:29:13+5:302015-04-02T00:29:32+5:30
गोवंशाचे छायाचित्र जमा करावे लागणार

राज्यात मालेगावला अनोखा आदेश
मालेगाव : शहरातील गोवंश पाळणाऱ्या व्यक्तींनी, मालकांनी आपल्याकडील गोवंशाची माहिती गोवंशाच्या छायाचित्रांसह संबंधित पोलीस ठाण्यात हमीपत्रासह जमा करावी, असा आदेश येथील पोलीस प्रशासनातर्फे काढण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या गोवंश हत्त्याबंदी कायद्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातून केवळ मालेगाव शहरात असा अनोखा आदेश जारी करण्यात आला असल्याने त्याविषयी जनसामान्यात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
विशेष म्हणजे, राज्यातील गोवंश हत्त्याबंदी कायदा उल्लंघन कायद्याचा पहिला गुन्हा गेल्या आठवड्यात मालेगावात दाखल झाल्याने स्थानिक पोलीस प्रशासनातर्फे शहरातील गोवंश खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर देखरेख ठेवण्यासाठी समितीचीदेखील स्थापना केली आहे. त्यात स्थानिक पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. मालेगावात गोवंश हत्त्याबंदी कायद्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाने शहरातील गोवंशाच्या छायाचित्रांच्या आधारे नोंद करण्याचे निश्चित केले आहे. त्यात ज्याच्याकडे गाय अथवा बैल ही जनावरे आहेत त्यांनी त्या जनावरांचे छायाचित्र काढून त्या छायाचित्रासोबत त्या जनावराची खरेदी कुठून केली, कधी केली, वा त्याचा जन्म त्या मालकाच्या ताब्यात संबंधित गाय असतानाच झाला आहे का, त्या जनावराचे वय किती, हे जनावर नेमके कोणत्या कामासाठी जवळ बाळगले आहे, विकावयाचे असल्यास कोणाला व कशासाठी विकणार आहे या प्रश्नांची उत्तरे हमीपत्रासह लिहून द्यावयाची आहेत. (प्रतिनिधी)