मालेगाव : विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सादर
By Admin | Updated: August 30, 2016 00:50 IST2016-08-29T22:46:48+5:302016-08-30T00:50:10+5:30
आयटकच्या विविध संघटनांचा मोर्चा

मालेगाव : विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सादर
मालेगाव : येत्या शुक्रवारी, दि. २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या देशव्यापी संपास पाठिंबा दर्शविण्यासाठी आयटकच्या वतीने विविध संघटनांतर्फे आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
इस्कस लायब्ररी येथून मोर्चास प्रारंभ झाला. नवीन बसस्थानक, शिवाजी पुतळा, मोसमपूल, महात्मा फुले पुतळ्यामार्गे मोर्चा प्रांत कचेरीवर आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी प्रा.के.एन. अहिरे यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली. प्रांताधिकारी अजय मोरे यांना मोर्चेकऱ्यांतर्फे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आशा, आशा गटप्रवर्तक, मनरेगा कर्र्मचारी, ग्रामरोजगार सेवक, एन.आर.एच. एम. कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस सेविका, संगणक परिचालक, वाहनचालक, पाणलोट कर्मचारी, पोषण-आहार आदि योजनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा.
पॉवरलूम कर्मचाऱ्यांचे मंडळ स्थापन करा, तयार झालेल्या घरकुलांचे त्वरित वाटप करा, घर कामगार मोलकरींच्या बंद केलेल्या योजना त्वरित सुरू करा, सन्मानधन व मंडळाच्या योजनांचा त्वरित लाभ द्या, किमान वेतन दरमहा सर्व कर्मचाऱ्यांना १८ हजार द्या, मोर्चामध्ये वाल्मीक देवरे, ललित वाघ, श्रीमती मंगला मिश्रा, अतित शेख, प्रकाश भावसार, चित्रा वाणी, प्रमोद देवरे, राजू निकम, शोभा सावकार, सुरेखा खैरनार, शशिकांत अहेर, नामदेव आहिरे, विजय गायकवाड, आशा काकळीज, माया घोलप सहभागी झाल्या होत्या. मोर्चात घरकामगार मोलकरीन संघटना, म.रा. आरोग्य आशा व आशा गटप्रवर्तक संघटना, म. रा. ग्रामरोजगार सेवक संघटना, पॉवरलूम कामगार संघटना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कर्मचारी संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ, वीज वर्कर्स फेडरेशन नाशिक जिल्हा, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना, वाहनचालक संघटना, बांधकाम कामगार कर्मचारी संघटना ईपीएफ ९५ पेन्शनर्स फेडरेशन नाशिक जिल्हा, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना, किसान सभा नाशिक जिल्हा, लालबावटा शेतमजूर युनियन, डी.एड. व बी. एड. बेरोजगार समिती सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)