माळेगाव पोलीस चौकीस मान्यता
By Admin | Updated: January 11, 2016 22:35 IST2016-01-11T22:33:29+5:302016-01-11T22:35:19+5:30
चर्चासत्र : निमा पदाधिकारी, पोलीस अधिकारी व उद्योजकांचा सहभाग

माळेगाव पोलीस चौकीस मान्यता
सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीत पोलीस चौकी सुरू करण्यासाठी निमा कार्यालयासमोर जागा उपलब्ध करून देणार असल्याचे निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष अरुण चव्हाणके यांनी सांगितले. माळेगाव येथे निमाच्या कार्यालयात पोलीस अधिकारी, निमाचे पदाधिकारी व उद्योजक यांचे चर्चासत्र पार पडले.
निमाने वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर माळेगाव औद्योगिक वसाहतीत पोलीस चौकी सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. मात्र, अद्याप पोलीस चौकी सुरू झालेली नाही. निमा त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यास तयार असून, लवकरात लवकर येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी चव्हाणके यांच्यासह उद्योजकांनी केली.
निमा व उद्योजकांकडून सहकार्य मिळत गेले आहे. त्यामुळेच पोलिसांना सर्व कामे करण्यास सोपे गेले असून, यापुढेही उद्योजक व पोलीस एकमेकांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करतील असे पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे यांनी सांगितले. उद्योजकांनी आपल्या सुरक्षा रक्षकांना शिट्ट्या, बॅटरी व काठी उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर कारखाना परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन सपकाळे यांनी केले.
औद्योगिक क्षेत्रात प्रादेशिक विभागाकडे आरक्षित असणाऱ्या भूखंडाविषयीचे आराखडे व माहिती सादर केली जाईल. त्यातून माळेगाव औद्योगिक क्षेत्रात नवीन स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्यासाठी मदत होईल असे प्रादेशिक विभागाचे अधिकारी एम.सी. लोंढे यांनी सांगितले. पोलीस चौकी उभारण्यासाठी भूखंड आरक्षित करून द्यावा, त्यानंतर आपण पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा करणार असल्याचे सपकाळे यांनी सांगितले.
यावेळी एस.के. नायर, किरण जैन, रवींद्र राठोड, संदीप भदाणे, नारायण पाटील, माळेगावचे ग्रामविकास अधिकारी के.सी. वाक्चौरे, मंगेश सांगळे, योगेश मोरे, सचिन कंकरेज, बी.एस. हासे, के. झेड. थॉमस, सोमनाथ पवार, विनायक भट, किरण भंडारी, किरण वाघ, पी.सी. हिंपलगावकर, विजय अस्तुरे, के. आर. कांबळे, दिनेश करवा यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. सुधीर बडगुजर यांनी आभार मानले. (वार्ताहर)