मालेगाव मनपाची एप्रिलमध्ये निवडणूक
By Admin | Updated: February 17, 2017 00:49 IST2017-02-17T00:49:03+5:302017-02-17T00:49:29+5:30
आढावा : प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन

मालेगाव मनपाची एप्रिलमध्ये निवडणूक
नाशिक : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नाशिक महापालिकेची निवडणूक आटोपत नाही तोच मालेगावसह राज्यातील सहा महापालिकांची एप्रिलमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केले असून, त्यापार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे विभाजन, तसेच प्रभाग रचना व आरक्षणाची माहिती जाणून घेण्यात आली आहे.
यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधित महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीच्या सूचना केल्या आहेत. मालेगाव, भिवंडी-निजामपूर, लातूर, परभणी, चंद्रपूर व पनवेल या सहा महापालिकांची मुदत मे महिन्यात संपुष्टात येत असून, तत्पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीद्वारे नगरसेवकांची निवड होणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने एप्रिल महिन्यात निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे. गुरुवारी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी या सहाही महापालिकेचे आयुक्त तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संपर्क साधला व माहिती घेतली. या महापालिकांच्या प्रभाग रचना यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या असून, आरक्षणही काढण्यात आलेले आहे. त्यामुळे आता प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन करण्यात येणार आहे.
दरम्यान, एप्रिलमध्ये महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याने मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर आगावू कामे पूर्तीसाठी धावपळ उडणार आहे.